नालासोपारा :- ज्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले त्यांना शिक्षा होते, असा समज तुम्ही करुन घेतला असेल तर तो चुकीचा आहे. ठाणे व पालघर लाचलुचपत विभागाने २०१८ ते २०२२ यादरम्यान लाचलुचपत विभागाने ३४ सापळे रचून ५४ आरोपींना जाळयात सापडले. यातील काही जणांना शिक्षा झाली तर काही निर्दोष सुटले व काही जणांचे खटले अद्यापही प्रलंबित आहेत. लाचखोरांना न्यायालयाने दोषमुक्त केल्याने ते सरकारी सेवेत उजळमाथ्याने वावरत आहेत. तर ज्या लाचखोरांवरील खटले प्रलंबित असून तेदेखील सातव्या वेतनाचे लाभ घेत आहेत. पोलिसांकडून पुरेसा पाठपुरावाच होत नसल्याने हे खटले रेंगाळलेले आहेत. त्यामुळे लाच घेताना पकडले, की सहा महिने निम्मा व त्यानंतर पूर्ण पगारासह मजेत नोकरी करा, अशी परिस्थिती आहे. कायदा व शासकीय सेवा नियमन कायद्यान्वये कोर्टात तारीख पे तारीख अन् कर्मचारी पुन्हा लाच घ्यायला मोकळे, अशी परिस्थिती आहे.

कोणत्या वर्षात किती लाचखोर आढळले?

१) सन २०१८ – ६ केसेस, ८ आरोपी

२) सन २०१९ – ७ केसेस, १० आरोपी

३) सन २०२० – ४ केसेस, ६ आरोपी

४) सन २०२१ – ११ केसेस, १८ आरोपी

५) सन २०२२ – ६ केसेस, १२ आरोपी

पाच वर्षांत किती लाचखोरांना झाली शिक्षा

मागील पाच वर्षात पकडलेल्या लाचखोरांपैकी ४ ते ५ म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लाचखोरांना शिक्षा झाली आहे. काही प्रकरणे प्रलंबित व काही प्रकरणे कोर्टात सुरू आहेत.

लाच घेतली तर शिक्षा किती ?

सरकारी नोकर नसताना आहे असे भासवून पैसे घेणे हे कृत्य फसवणूक या गुन्ह्यात मोडते. या गुन्ह्यास तीन वर्षे कारावास अगर दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सरकारी नोकराकडे वशिला लावून विशिष्ट प्रकारचे काम करून घेण्यासाठी कोेणीही लाच घेतली, तर त्यास एक वर्ष साधी कैद अगर दंड, अथवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जातात. सरकारी कामकाजाशी संबंधित गोष्ट करण्यासाठी लोकसेवकाने एखादी मौल्यवान वस्तू घेतली तर तो गुन्हा ठरतो. या गुन्ह्यासाठी कायद्यात तीन वर्षे शिक्षा अगर दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

लाच मागतोय, करा तक्रार

भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधा. ई मेल dypacbpalghar@gmail.com, टोल फ्री नंबर – १०६४, दूरध्वनी क्रमांक – ०२५२५ – २९७२९७ आणि व्हॉट्सअप क्रमांक – ९९२३३४६८१०, ८००७२९०९४४

कोट

सरकारी काम करण्यासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी असो वा लोकप्रतिनिधी लाचेची मागणी करीत असेल तर, त्यांच्याविरुद्ध बिनधास्त तक्रार करा, तुमचे कोणतेही काम अडणार नाही. – नवनाथ जगताप (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *