
आयुक्तांच्या आस्थापना विभागाला सूचना करूनही आस्थापना विभाग झोपेत !
वसई : (प्रतिनिधी) :
वसई-विरार शहर महानगरपालिकेत 30 ते 30 वर्षांहून अधिक काळ काम करूनही बहुतांश कर्मचार सेवा जेष्ठता यादीपासून दुरच असल्याने तसेच या कर्मचार्यांना सेवा जेष्ठता यादित समाविष्ट करण्याच्या सूचना करूनही महापालिकेच्या आस्थापना विभागाला जाग येत नसल्याने जुन्या जाणत्या कर्मचार्यांना कनिष्ठ पदावरूनच निवृत्त व्हावे लागत आहे. याबाबत पालिका कर्मचार्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून त्यांनी तशी नाराजी व्यक्तदेखील केली आहे.
सेवाजेष्ठता यादित समाविष्ट झालेल्या कर्मचार्याला शासनाकडून निवृत्ती वेतन व भत्ते यांचा चांगला लाभ मिळतो. शिवाय महापालिकेच्या एखाद्या आस्थापनेय पदोन्नतीदेखील मिळते. मात्र पालिकेचा आस्थापना विभाग सुस्त असल्याने बहुतांश कर्मचार्यांना कनिष्ठ पदावरूनच निवृत्त व्हावे लागत आहे. तसेच निवृत्तीनंतर त्यांना ज्या कनिष्ठ पदावरून निवृत्त झाले त्यानुसारच निवृत्ती वेतन तथा भत्ते मिळतात. महापालिकेच्या आधीपासून वसई-विरार शहर महानगरपालिकेत अनेक कर्मचारी शासकीय सेवेत आहेत. मात्र या कर्मचार्यांना सेवा जेष्ठता यादीची प्रतिक्षा आहे.
पालिकेचा आस्थापना विभाग त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने हे जेष्ठ कर्मचारी नाराज आहेत. त्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याने त्यांनी आस्थापना विभागावर आता उघडउघडपणे नाराजी दर्शवली आहे. अनेक वर्ष सेवा होऊनही सेवा जेष्ठता यादित त्यांना डावलले जात असल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे.