
बिल्डरधार्जिन कारभार हकणारा अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलला निलंबित करण्याची मागणी…
नालासोपारा(प्रतिनिधी)- वसई विरार पालिकेच्या पेल्हार प्रभागाने आज परमार इंडस्ट्रीज परिसरातील एका आदिवासी बांधवांच्या घरावर
बुलडोझर चालवत सुडबुद्धीची कारवाई पार पाडली. विशेष म्हणजे पेल्हार प्रभागात जागोजागी असंख्य अनधिकृत बांधकामे बिनदिक्कत पणे सुरू आहेत. परंतु त्या ठिकाणी कारवाई करण्यास वेळकाढू पणा करणारे अतिक्रमण अधिकारी
प्रमोद गोयलने आदिवासीच्या घरावर बुलडोझर चालवून कारवाईचे सोपस्कार पार पाडले.विशेष म्हणजे ज्या आदिवासी बांधवांच्या घरावर पालिकेने बुलडोजर चालवला त्या पालिका प्रशासनाला याच आदिवासी जागेवर काही बिगर आदिवासी व्यक्तींनी जबरदस्तीने केलेले अतिक्रमण दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मौजे पेल्हार स नं १७६/३/२ ही दत्तू भिक्या वरठा यांची वडिलोपार्जित मालकी हक्काची मिळकत आहे.या मिळकतीमधील १३ गुंठे जागेत बिगर आदिवासी मोहम्मद युनूस इस्लाईल खान व इतर ३ यांनी जबरदस्तीने कब्जा केला आहे. सदर बिगर आदिवासी विरोधात दत्तू वरठा यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.
त्यातच या जागेवर लगतचे काही लोक ही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने दत्तू वरठा यांनी सदर जागेच्या संरक्षणाच्या हेतूने पत्राशेडचे घर उभारले होते. परंतु या घरावर आज पालिकेच्या पेल्हार प्रभागाने बुलडोझर चालवून ‘आपण किती कार्यतत्पर आहोत’ हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पेल्हार प्रभागाच्या अशा प्रकारच्या
सुडबुद्धीची कारवाईचा सर्वच स्तरातुन निषेध नोंदवण्यात येत असून प्रभागात सुरु असलेली असंख्य अनधिकृत बांधकामे न तोडता गरिब आदिवासी बांधवांच्या घरावर बुलडोजर चालवून
बिल्डरधार्जिन कारभार हकणारा अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दत्तू वरठा यांना न्याय कधी मिळणार?
दत्तू वरठा यांच्या घरावर काल पालिकेने कारवाई करून कार्यतत्पर असल्याचा आव आणला.परंतु ही कारवाई करताना पालिकेने माझ्या जागेवर झालेले अतिक्रमण आजपर्यंत दूर का केले नाही असा थेट सवालही पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.दत्तू वरठा हे स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेत झालेल्या अतिक्रमणा बाबत गेल्या
५ वर्षापासून पालिका दरबारी पाठपुरावा करत आहेत.तसेच वरठा यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्या न्यायालयात क्र/महसूल/कक्ष-१/टेनन्सी/प्रत्यार्पन दावा क्र.०१/२०२१ दाखल केला होता.
सदर दाव्याच्या सुनावणी होऊन दि.०९/१०/२०२१ रोजी आदेश पारित करण्यात आला आहे व सदरचा आदेश दत्तू वरठा यांच्या बाजूने दिला होता.तसेच सदर जमीनीची सरकारी हद्द कायम मोजणी करण्याचे आदेश सुद्धा मा.अधीक्षक, भुअभिलेख पालघर यांना देण्यात आले होते.या आदेशानुसार अतितातडीने हद्द कायम मोजणी मो.रं.नं ८६७३/२०२१ करून सदर जमीन वरठा यांच्या ताब्यात देण्यात आली होती.शिवाय बिगरआदिवासी द्वारा अतिक्रमण करून करण्यात आलेले औद्योगिक व वाणिज्य स्वरूपाच्या गाळ्यांचे बांधकाम १५ दिवसाच्या आत काढून घेण्याचे आदेश दिले होते.आणि जर स्वतःहून सदरचे अनधिकृत बांधकाम दूर न केल्यास वसई विरार महापालिका प्रशासनालाही सदरचे बांधकाम दूर करण्यासाचे आदेश दिले होते. याशिवाय याठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत वराठा यांनी वसई विरार महापालिकेकडे दि.१८/०९/२०१५ रोजी तक्रार अर्ज केला होता व त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपायुक्त यांनी व.वि.श.म/उपा-२/अन.बांध/५९/२०१५-१६ अन्वये दि.१७/१०/२०१५ रोजी सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कशीत करण्याचे आदेश सहा. आयुक्त प्रभाग समिती एफ यांना दिले होते.परंतु त्या अतिक्रमणावर अजूनपर्यंत कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही.उलटपक्षी आज बिल्डरधार्जिन कारभार हकणारा पेल्हार प्रभागातील अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलने सूडबुद्धीने कारवाई केली.या कारवाई विरोधात वरठा हे आता न्यायालयात दाद मागणार आहेत.