दरवर्षी १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने हात धुवा दिना निमित्त विविध उपक्रमाद्वारे हात स्वच्छ धुण्याचे महत्व व त्याचे आरोग्या विषयक फायदे याबाबत पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

यावर्षीची संकल्पना  (Theme) Unite for Universal Hand Hygiene  ही असून  कोरोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये हातांच्या स्वच्छतेने महत्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय डायरियासारख्या जीवघेण्या आजाराचा उगमही हातांच्या अस्वच्छतेशी निगडीत आहे. केवळ साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे डायरियापासून ४०टक्के बचाव करता येवू शकतो, यासाठी हातांच्या स्वच्छतेबाबत सर्वांनी एकजुट होणे आवश्यक आहे हा यावर्षीच्या संकल्पनेचा गाभा आहे.जागतिक हात धुवा दिना निमित्त संपुर्ण जिल्ह्यात दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी  आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी ग्रामपंचायत पातळीवर सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी हात धुण्याची पद्धती , हात धुण्याचे फायदे, हात धुण्याची शपथ व प्रात्यक्षिकाद्वारे स्वच्छतेचे महत्व या निमित्ताने सांगण्यात येतील. शालेय स्तरावर विद्यार्थांमध्ये हात धुण्याची सवय लागावी याकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समिती स्तरावर जागतिक हात धुवा दिना निमित्त  विविध उपक्रम घेण्यात येणार असे पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यानी सांगितले आहे.

तसेच स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय यांच्या माध्यमातून भारत सरकारने स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. शाळास्तरावर देखील शालेय विद्यार्थ्यांमध्येही साबणाने हात धुण्याची सवय रुजावी याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून गावागावांत हातांची स्वच्छता, तिचे महत्व, सद्यस्थितीतील वर्तन याबाबत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *