नालासोपारा(प्रतिनिधी)- १३ ऑक्टोबर रोजी वसई विरार पालिकेच्या पेल्हार प्रभागाने परमार इंडस्ट्रीज परिसरातील एका आदिवासी बांधवाच्या घरावर बुलडोझर चालवत सुडबुद्धीची कारवाई पार पाडली होती.पालिकेच्या या सुडबुद्धीने केलेल्या कारवाईचा सर्वच स्थरातून निषेध नोंदवत
अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु निलंबनाच्या मागणीची दखल पालिकेने न घेतल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.पेल्हार प्रभागात जागोजागी असंख्य अनधिकृत बांधकामे बिनदिक्कत पणे सुरू आहेत. परंतु त्या ठिकाणी कारवाई करण्यास अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयल जाणीवपूर्वक दिरंगाई करताना दिसत आहे.उलटपक्षी दुसरीकडे
प्रमोद गोयलने एका आदिवासीच्या घरावर बुलडोझर चालवून आपण किती कार्यतत्पर आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे अशा निष्क्रिय व बिल्डरधार्जिन कारभार करणाऱ्या
अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलने शासकीय नेमून दिलेल्या स्वकर्तव्यात जाणून बुजून ,हेतुपुरस्सर हयगय,कसुरपणा केला म्हणून अकार्यक्षमतेचा ठपका ठेऊन शिस्तभंगाची कारवाई करणे कामी पेल्हार प्रभागाचे सहा. आयुक्त शशिकांत पाटील यांनी पालिका उपायुक्तांकडे अहवाल सादर करणे क्रमप्राप्त होते. परंतु शशिकांत पाटील हे गोयल विरोधात अहवाल सादर करण्याऐवजी केवळ पाठराखण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे प्रमोद गोयलच्या बिल्डरधार्जिन कारभाराला सहा.आयुक्तांचीही साथ आहे का?असा सवाल उपस्थित होत आहे.


नेमके प्रकरण काय?

मौजे पेल्हार स नं १७६/३/२ ही दत्तू भिक्या वरठा यांची वडिलोपार्जित मालकी हक्काची मिळकत आहे.या मिळकतीमधील १३ गुंठे जागेत बिगर आदिवासी मोहम्मद युनूस इस्लाईल खान व इतर ३ यांनी जबरदस्तीने कब्जा केला आहे. सदर बिगर आदिवासी विरोधात दत्तू वरठा यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.
त्यातच या जागेवर लगतचे काही लोक ही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने दत्तू वरठा यांनी सदर जागेच्या संरक्षणाच्या हेतूने पत्राशेडचे घर उभारले होते. परंतु या घरावर १३ ऑक्टोबर रोजी पालिकेच्या पेल्हार प्रभागाने बुलडोझर चालवून ‘आपण किती कार्यतत्पर आहोत’ हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. दत्तू वरठा हे स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेत झालेल्या अतिक्रमणा बाबत गेल्या
५ वर्षापासून पालिका दरबारी पाठपुरावा करत आहेत.तसेच वरठा यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्या न्यायालयात क्र/महसूल/कक्ष-१/टेनन्सी/प्रत्यार्पन दावा क्र.०१/२०२१ दाखल केला होता.
सदर दाव्याच्या सुनावणी होऊन दि.०९/१०/२०२१ रोजी आदेश पारित करण्यात आला आहे व सदरचा आदेश दत्तू वरठा यांच्या बाजूने दिला होता.तसेच सदर जमीनीची सरकारी हद्द कायम मोजणी करण्याचे आदेश सुद्धा मा.अधीक्षक, भुअभिलेख पालघर यांना देण्यात आले होते.या आदेशानुसार अतितातडीने हद्द कायम मोजणी मो.रं.नं ८६७३/२०२१ करून सदर जमीन वरठा यांच्या ताब्यात देण्यात आली होती.
शिवाय बिगरआदिवासी द्वारा अतिक्रमण करून करण्यात आलेले औद्योगिक व वाणिज्य स्वरूपाच्या गाळ्यांचे बांधकाम १५ दिवसाच्या आत काढून घेण्याचे आदेश दिले होते.आणि जर स्वतःहून सदरचे अनधिकृत बांधकाम दूर न केल्यास वसई विरार महापालिका प्रशासनालाही सदरचे बांधकाम दूर करण्यासाचे आदेश दिले होते. याशिवाय याठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत वरठा यांनी वसई विरार महापालिकेकडे दि.१८/०९/२०१५ रोजी तक्रार अर्ज केला होता व त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपायुक्त यांनी व.वि.श.म/उपा-२/अन.बांध/५९/२०१५-१६ अन्वये दि.१७/१०/२०१५ रोजी सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कशीत करण्याचे आदेश सहा. आयुक्त प्रभाग समिती एफ यांना दिले होते.परंतु त्या अतिक्रमणावर अजूनपर्यंत कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही.
उलटपक्षी १३ ऑक्टोबर रोजी पेल्हार प्रभागाचे अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलने मोठ्या बांधकाम माफियांना वाचविण्यासाठी सूडबुद्धीने दत्तू वरठा यांच्या घरावर कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *