
तुम्हाला ऐकू येत नाही का साहेब ?
नालासोपारा :- बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षाचालक, खाजगी बसचालक जोरजोरात आरडाओरडा करत असतात. याचा त्रास प्रवाशांसोबत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होतो. मुळात अशाप्रकारे प्रवाशांना बोलावणे बेकायदेशीर आहे. तरीही असे प्रकार वसईत सर्रासपणे वसईतील रस्त्यावर घडताना दिसून येतात. रिक्षाचालक बिनधास्तपणे बस स्थानकात येऊन प्रवाशांना रिक्षातून प्रवास करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्रवाशांसाठीचा हा गोंधळ दिवसा रात्री सुरू असतो.
स्थळ : नालासोपारा बसस्थानक, शुक्रवार, दुपारी दोनची वेळ
५०० आणि दुसऱ्यावेळी दीड हजाराच्या दंडाची तरतूद
अश्या प्रकरणात पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. बस स्थानकांच्या बाहेर उभे राहून जोरजोरात ओरडणाऱ्या विरोधात पहिल्यांदा ५०० रुपये दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा तीच व्यक्ती पुन्हा आढळून आली तर दीड हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
दिवाळीत एकावरही कारवाई नाही
दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी नालासोपारा बस स्थानकांवर होती. याठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्स, रिक्षा, टॅक्सीवाले जोरजोरात प्रवाशांना बोलवत होते पण यावेळी एकावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
हा गोंगाट तुम्हाला ऐकू येत नाही का साहेब ?
अशा प्रकरणात आजपर्यंत वाहतूक शाखेने अशी एकही कारवाई केलेली ऐकिवात नाही. राजरोसपणे असे प्रकार वसईत घडत असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. या लोकांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असून या लोकांच्या खाजगी वाहनामुळे वाहतूक कोंडी होते. या लोकांवर पोलीस काय कारवाई करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
पहा बसस्थानकावरील गोंधळ
नालासोपारा पश्चिमेकडील एस टी डेपोमध्ये अनधिकृतपणे घुसून रिक्षावाले प्रवाशी रिक्षात बसवतात. ट्रेन आली की येणाऱ्या नागरिकांना ओरडून रिक्षात दिवसा रात्री बसवतात.
बसस्थानकात कारवाई कोण करणार ?
खाजगी वाहने, रिक्षा, टॅक्सी बिनधास्तपणे प्रवाशी भरण्यासाठी व सोडण्यासाठी बस स्थानकात येतात. पण यांच्यावर आजपर्यंत कोणीही कारवाई केलेली नाही. लोकांना येताना जाताना त्रास होत असल्याने यांच्यावर नेमकी कारवाई कोण करणार हा प्रश्न पडला आहे.
नालासोपारा बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा
येथे रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ऑटोरिक्षाधारक सैरभैर वळवतात. प्रवाशी पळविण्यासाठी दिवसभर ऑटोरिक्षा बस स्थानकांत अक्षरशः घिरट्या घालत असतात. अतिशय वर्दळीचा डेपो असल्यामुळे याठिकाणी नेहमी गर्दी असते. खासगी वाहन धारकांना वेळीच पायबंद घातला नाही तर यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
कोट
प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी जोरजोरात ओरडणाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. असे जोरजोरात ओरडणे हा गुन्हा असल्याने त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल. – वाहतूक विभाग