
प्रतिनिधी:
पालघर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात अनागोंदी कारभार असल्याचे अनेक पुरावे समोर येत असून अंदाधुंद भ्रष्टाचार होत आहे. निरीक्षक स्तरावरील या भ्रष्टाचाराला वरिष्ठांचे ही आशीर्वाद लाभलेले आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्या ही शासकीय कार्यालयात अंदाधुंदपणे भ्रष्टाचार चालूच शकत नाही.
राज्य उत्पादन शुल्क पालघर विभागा अंतर्गत कार्यालयांच्या हद्दीत अनेक रेस्टॉरंट व बियर बार, वाईन शॉपमध्ये बनावटी दारूची विक्री होते. तसेच चोरीची दारू ही ठेवली जाते. या सर्व गैरधंद्यांबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांना माहिती असते. मात्र त्यांच्याच संरक्षणात हा भ्रष्टाचार चालतो. रेस्टॉरंट व बियर बार, वाईन शॉपवाल्यांकडून महिन्याकाठी अधिकाऱ्यांना लाच दिली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून फार क्वचितच धाडी टाकून कारवाई करण्यात आल्याचे निदर्शनास येते. जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत ही मोठा गैरव्यवहार होत असून माल परस्पर विकला जात असल्याचे समजते. धाडी टाकल्यानंतर पंचनामे करताना मुद्दे माल कमी दाखविला जातो.
पालघर जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत किमान १० गावठी दारूचे अड्डे चालतात. सदर अड्डयांवर कारवाई होत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या संरक्षणात हे अड्डे चालतात.
राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये खाजगी इसम जणू ते सरकारी कर्मचारी असल्याप्रमाणे कार्यालयात खुर्चीत बसून सरकारी कामे करताना व महत्वाची शासकीय कागदपत्रे हाताळताना दिसतात. या खाजगी इसमांचे बियर बार व वाईन शॉप ही आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागात चाललेल्या या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी व्हावी व योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी.