
.
आज दि. १/११/२०२२ रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश गावड, सहसचिव ॲड.प्रथमेश प्रभुतेंडोलकर, ग्रामपंचायत दांडे -खटाळी चे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच बिपिन बारी यांनी केळवे, दांडे -खटाळी गावातील लोकांच्या वाहतुक समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
सदर चर्चेत केळवे बाजार ते केळवे रोड या मार्गावरील बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरु करणे, प्रवासी वर्ग व महामंडळ या दोघांनाही सोईस्कर होईल अश्या सुवर्ण मध्याबाबत चाचपणी, केळवे बीच पर्यटन स्थळांवर वाढती पर्यटकांची संख्या आणि त्यांची होणारी गैरसोय दूर करणेसाठी प्रायोगिक तत्त्वावर शनिवार – रविवार पर्यटक विशेष फेऱ्या सुरू करणे, ज्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल व पर्यटन पुरक व्यवसायात असलेल्या लोकांनाही फायदा होईल.
केळवे बाजार येथे रात्र वस्तीस असणाऱ्या गाड्या दांडे गावातून सोडल्यास दांडे -खटाळी गावातील लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायद्याचे ठरू शकते, यासाठी दांडे ग्रामपंचायतीने महामंडळाच्या बसेस ठेवणेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविलेली आहे.महामंडळाच्या बसेस ,चालक व वाहक यांना विश्रांती घेण्यासाठी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल असे दांडे-खटाळी ग्रामपंचायतीचे सदस्य बिपिन बारी यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आश्वस्त केले.
सदर विस्तृत चर्चेदरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, लोकांसाठी जे -जे करता येईल त्याबाबतीत आम्ही नेहमीच सकारात्मक निर्णय घेत असतो असे प्रकर्षाने सांगितले.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या, निवेदनात उल्लेखीत मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत.
