
प्रतिनिधी :- वसई तहसील कार्यालयात बिनशेती विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई तालुका ग्रामीण उपाध्यक्ष प्रशांत धोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांना पत्र दिले आहे.
वसई तहसील कार्यालयात बिनशेती विभागात दलालांचा सुळसुळाट झालेला असून प्रती चौरस फूट ३ ते ५ रुपये प्रमाणे लाच देऊन दलाल तात्काळ बिनशेतीची कामे करून घेतात. सामान्य नागरिकांनी भूखंड बिनशेती करून घेण्याकरिता अर्ज केला तर त्याला अनेक फेऱ्या माराव्या लागतात. तरी ही कामे होत नाहीत. भूखंडाचा बिनशेती आदेश मंजूर करताना असलेल्या नियमांना हरताळ फासून बिनशेती आदेश मंजूर केले जातात.
बिनशेती आदेश मंजूर करण्यात प्रचंड भ्रष्टाचार होत असून या बाबतची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रशांत धोंडे यांनी केली आहे. याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नव निर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रशांत धोंडे यांनी दिला आहे.