वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाच्या 13 व्या संमेलनाचे मोठ्या थाटात उद्घाटन

वसई : वार्ताहर

केवळ प्रेयसीच्या गालावरील तीळ शोधणाऱ्या कविता करून न थांबता धोक्यात आलेली धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत वास्तव मांडणारे लेखन होणे आज गरजेचे आहे. वेदना, सौंदर्य आणि विद्रोह यांचा सुरेख संगम म्हणजे साहित्य. माणसाच्या हृदयात डोकावते, अश्रू पुसते ते खरे साहित्य. माणूस आणि समाजाच्या प्रश्नांबाबत विशिष्ठ भूमिका घेऊन साहित्यिकांनी लिहिणे समाज जोडण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी वसई येथे केले.
वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेच्या सहकार्याने एक दिवसीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन स्व. फादर बर्नर्ड भंडारी सभागृह, देवतलाव, वसई (प ) येथे आयोजित करण्यात आले होते. ’अभिव्यक्ति स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता’ या विषयावर बेतलेल्या या 13 व्या संमेलनाचे उदघाट्न ज्येष्ठ साहित्यिक कांबळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व सहित्यिक अ‍ॅन्ड्र्यू कोलासो यांना यंदाचा ‘गार्डवेल साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. मंडळाच्या ‘शब्दांकुर’ स्मरणिकेचे, तसेच सिस्टर मॉनिका तवारीस यांच्या ‘प्रकाशाची वाट’, मॅग्देलेना अथाईड यांचे ‘माझ्या कवितेच्या अंगणात’, जेरॉल्ड अथाईत यांच्या ‘माझा श्रद्धेचा प्रवास’, रेमंड मच्याडो यांच्या ‘जाना कुमारी’ (दुसरी आवृती ) इत्यादी पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

     संमेलनाध्यक्ष म्हणून बोलतांना कांबळे यांनी,

वसई म्हणजे ख्रिसमस-ट्री असून विचार करणारे, लढवैये शहर आहे, अशा शब्दांत वसईचा गौरव केला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आजच्या व्यवस्थेला राज्यघटनेचा अडथळा वाटत आहे. म्हणून व्यवस्थेकडून धर्माचा गैरवापर सोयीच्या राष्ट्रवादासाठी केला जात आहे. संविधानाने दिलेली धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाजूला सारून, वेगवेगळे विषय लादून मुलतत्ववादाला खतपाणी घालण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. विकासाचा मार्ग विचार आणि प्रश्नाच्या गर्भातून उदयास येतो. मात्र माणसांनी विचार करू नये, प्रश्न विचारू नये म्हणून ‘व्यवस्था’ विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे. इतकेच नव्हे तर देशात ‘विष’ पेरणार्‍यांची चरित्रे आता लिहिली जात आहेत. अश्या परिस्थितीत घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाने आपल्या परीने व्यक्त होत राहिले पाहिजे, असे आवाहन कांबळे यांनी यावेळी केले.

    प्रारंभी गासच्या गोन्सालो गार्सिया विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा आणि लेझीमच्या पथकाद्वारे संचलन करीत पाहुण्यांचे मिरवणूक काढून स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष रेमंड मच्याडो यांनी प्रास्ताविक, तर सचिव लेस्ली डिसिल्वा यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक फादर हिलरी फर्नांडिस ,माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस, फ्रँकलिन डायस, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, समाजवादी नेते मनवेल तुस्कानो, फादर मायकल जी, फादर टोनी जॉर्ज, महाराष्ट्र्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे प्रसाद कुलकर्णी आणि एल.बी. पाटील उपस्थित होते. यावेळी गायिका लॅरिसा आल्मेडा, 'जागर मराठी'चे संतोष गायकवाड, कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे, रुग्णमित्र लेनी परेरा यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मेबल डिकूना आणि शिल्पा परुळेकर यांनी, तर आभारप्रदर्शन सिडनी मोरायस यांनी केले.
    #चौकट #

दुपारच्या सत्रात डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या अध्यक्षतेखाली ‘साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात मनोज आचार्य, प्रा. मॅक्सवेल लोपीस, एल. बी. पाटील आणि छगन नाईक या विचारवंतानी आपल्या भूमिका मांडल्या. यावेळी आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अभिनंदनाचा ठराव छगन नाईक यांनी मांडला व त्यास सर्वांनी सहमती दर्शवली. सायंकाळच्या सत्रात सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात 17 नामवंत कवयित्री व कवीनी भाग घेतला. कवींचे स्वागत कवयित्री शिल्पा परुळेकर यांनी केले. शेवटी स्टीफन एम. परेरा यांनी दिवसभरातील कार्यक्रमांचा आढावा घेऊन संमेलनाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *