मनपाने फी घेऊनही जागा अचानक नाकारल्याने वाद

नालासोपारा :- दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मोठ्या उत्साहात सुरु होऊ पाहणारी पौराणिक निर्मळ तिर्थक्षेत्राची यात्रा खेळणी लावण्यावरून वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.
आद्य जगतदगुरु शंकराचार्यांची समाधी असलेल्या पौराणिक निर्मळ गावात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस यात्रा भरते. तब्बल १५ दिवस चालणार्‍या या यात्रेत नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यातील भाविक-रसिक लाखोंच्या संख्येने सहभागी होत असतात. सातारी कंदीपेढ्यापासून वसईच्या सुकेळीपर्यंतचा मेवा आणि वडा-पाव पासून चायनीज पर्यंतचे खाद्य पदार्थ तसेच लहान मुलांच्या चक्री पासून आकाश पाळणे, मौत का कुंआ अशी खेळणी लोकांचे प्रमुख आकर्षण ठरत असतात. पालखीतही हजारो बांधव सहभागी होण्यासाठी आतुर असता. अशी ही निर्मळची यात्रा कोरोना काळात झाली नव्हती. तर एका वर्षी अवकाळी पाऊसामुळे यात्रा धुवून निघाली होती. त्यानंतर यंदा कोणतेही संकट नसल्यामुळे आयोजक, भाविक आणि व्यापार्‍यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

मात्र, यंदा खेळणी लावण्यासाठी एका स्थानिकाने मागितलेल्या जागेवरून ही यात्रा वादात सापडली आहे. मंदिराच्या खालच्या बाजुस असलेली जागा यात्रेच्या काळात खेळणी लावण्यासाठी स्थानिक भुमिपुत्र नितीन पेंढारी यांनी मनपाकडे मागितली होती. पालिकेनेही १२ हजार रुपये फी घेवून त्यांना जागा मंजुर केली होती. मात्र, अचानक पत्र पाठवून पालिकेने ही जागा पेंढारी यांना नाकारली आहे. निर्मळ देवस्थान विश्‍वस्त मंडळाने त्यावर हरकत घेतल्यामुळे ही जागा नाकारण्यात आली आहे. त्यामुळे विश्‍वस्त मंडळ स्थानिकांना डावलून बाहेरच्या फेरिवाल्यांना, खेळणावाल्यांना साथ देत असल्याचा आरोप पेंढारी यांनी केला आहे.

यात्रेचा परिसर महापालिकेकडून स्वच्छ केला जातो. दिवाबत्ती, रस्ते आणि इतर व्यवस्थाही पालिकेकडून केली जाते. मात्र, यात्रेची फी मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाकडून वसुल केली जाते. त्यामुळे यात्रेत व्यवसाय करण्यासाठी जागा कोणाला द्यायची याचे हक्क, अधिकार पालिकेला असताना, पालिका अधिकार्‍यांनी विश्‍वस्त मंडळाचे ऐकून आम्हाला मंजुर केलेली जागा नाकारली आहे. तर नितीन पेंढारी यांना यात्रेसाठी जागेची परवानगी आली होती. मात्र श्रीमद् सद्गुरु शंकराचार्य विश्‍वस्त मंडळाची परवानगी घेतली नसल्यामुळे सदर परवान्यातील अट क्र. १५ नुसार, परवान्याबाबत वाद किंवा तक्रार आल्यास दिलेला परवाना रद्द करण्यात आल्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांनी लेखी कळवले आहे. त्यामुळे २० तारखेला सुरु होण्यापुर्वीच निर्मळची यात्रा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

कोट

१) गेल्या ७० वर्षापासून जे नियमित यात्रेला व्यवसाय करतात त्यांनाच त्यांच्याच जागा मिळणार. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. यावर्षी २० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान निर्मळची यात्रा सुरू होणार आहे. – पंकज चोरघे, (विश्‍वस्त, शंकराचार्य मंदिर ट्रस्ट, निर्मळ)

२) या एकंदर प्रकारामुळे मला दिलेली परवानगी पालिका कशी काय रद्द करु शकते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. – नितीन पेंढारी (स्थानिक व तक्रारदार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *