वसई-विरार पालिकेतील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

विरार, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील कर्मचारी विविध प्रकरणांत अडकले असून त्यांच्या चौकशा रखडल्या होत्या. चौकशा रखडलेले वर्ग-क व वर्ग-डमधील तब्बल ४२ कर्मचाऱ्यांची चौकशी पालिकेने अखेर हाती घेतली आहे. त्यामुळे चार वर्षांपासून रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीला अखेर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
वसई-विरार पालिकेतील कर्मचाऱ्यांची कामात हलगर्जी, निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते; तर काही वरिष्ठ लिपिक व अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी आरोप होते. त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते; मात्र चार वर्षांहून अधिक काळ या चौकशी रखडल्या होत्या. त्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व सिद्ध होत नसल्याने त्यांच्या निवृत्तिवेतन, पगारवाढ व पदोन्नती अशा बाबींवर गंडांतर आले होते. त्यामुळे ही चौकशी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी होत होती.
महापालिकेतील वर्ग-क व वर्ग-डमधील या ४२ कर्मचाऱ्यांत २० सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; तर ११ कर्मचाऱ्यांत वाहनचालक, आरोग्य निरीक्षक, अधीक्षक व वरिष्ठ लिपिकांचा समावेश आहे. उर्वरित अन्य ११ कर्मचाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीकरिता पालिकेने काही सेवानिवृत्त नियुक्त केले आहेत; तर उर्वरित कर्मचाऱ्यांची चौकशी त्यांच्या उपायुक्त व सहायक आयुक्तांमार्फत होणार आहे. सादरकर्ता अधिकारीही त्याच खात्यातील असणार आहेत. या चौकशीचा निर्णय पुढील ६० ते ९० दिवसांत येणे अपेक्षित आहे, अशी माहिती पालिकेच्या आस्थापना विभागातर्फे देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *