
नालासोपारा :- तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला २० नोव्हेंबर पासून सुरूवात झाली आहे. निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. पालघर जिल्ह्यातून हजारो भाविक या समाधीचे दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. ही यात्रा पंधरा दिवस असते. निर्मळ येथील विमल तलाव हे पवित्र तिर्थ असल्याचे भावीक मानतात. देव-देवतांनी या विमल तलावात स्नान केले असल्याची आख्यायीका आहे. ख्रिस्त जन्माच्या पाच हजार वर्षापूर्वीपासूनचा पौराणिक इतिहास या पुरातन तीर्थक्षेत्राला लाभलेला आहे. भगवान श्रीपरशुरामांनी विमलासुराचा वध करून श्रीविमल-निर्मळ सरोवर तीर्थाची निर्मिती केली आहे. या तीर्थाचे पावित्र्य काशी-प्रयागासारखा आहे. या तीर्थाच्या परिधीत भरणाऱ्या यात्रेत तीर्थस्नान, पिंडदान, तर्पण, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, देवदर्शन वगैरे पुण्यकार्यासाठी दुरून यात्रेकरू अनेक वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने येतात.
निर्मळ तीर्थक्षेत्री अनेक ऋषी, पांडव, जगद्गुरु आद्य शंकराचार्य, बुरुड राजा, देवप्रियदर्षी राजा, सातवाहन राजे, राजा भीमदेव, नाथाराव सिंधा भंडारी, ब्रह्मेंद्र स्वामी, श्रीमंत पेशवे यांचेही आगमन झाले होते. या क्षेत्राचे पावित्र्य व तीर्थयात्रेकरूंच्या धार्मिक भावनांचा आदर राखणे हे सरकार, प्रशासन, सुरक्षा यंत्रणेचे कर्तव्य आहे. या यात्रौत्सवात मांसपदार्थ विक्रीही यात्रा काळात यात्रेच्या सीमेत न करण्याचा निर्धार स्थानिकांनी केला असताना यात्रेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. श्रीमद जगद्गुरु शंकराच्या मंदिराला लागूनच मनोर, पालघर येथील आलेल्या एका ग्रुपने मांसाहार करत येथेच यथेच्छ मध्यपान केले आहे. याबाबत स्थानिक जागरूक नागरिकांनी वसई पोलिसांना कळवले. हे कळविल्यानंतर भुईगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मद्यपींना समज देत तिथून हाकलून दिले. यात्रेत मांस मच्छी व दारु विक्री करण्यास बंदी करण्याचा विचार सुरू असतानाच चक्क मंदिराला लागूनच यात्रेच्या पहिल्याच दिवशी दारू मटणाच्या पार्ट्या होत असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.