बोईसर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यातून भंगार चोरी करताना सिलेंडरचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २९ ऑक्टोबरला घडली होती.याप्रकरणी वीस दिवस उलटून गेल्या नंतर देखील अजून कोणावरही गुन्हा दाखल झाला नसून चोर अजूनही फरार आहेत. त्यामुळे बोईसर एमआयडीसी पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केल्या जात आहेत.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कुंभवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या औरा ऑइल या बंद कारखान्यात २९ ऑक्टोंबर ला संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने भंगार कापत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन एक चोर गंभीर जखमी झाला होता.तर बाकीचे चार ते पाच चोर आणि जेसीबी व क्रेन चालक यांनी घटना घटनास्थळावरून पळ काढला होता.स्फोटाची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल आणि बोईसर पोलिसांनी दुर्घटना स्थळी पोचून आग आटोक्यात आणली व जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

औरा ऑइल या २०१६ पासून बंद असलेल्या कारखान्यातील भंगार चोरी प्रकरणात सुरवातीपासूनच संशयाचा धूर निर्माण झाला आहे. घटनेच्या दिवशी दुपारी कंपनीचे फाटक उघडून आतमध्ये भंगार चोरीसाठी पाच-सहा व्यक्ती आणि त्यांच्यासोबत जेसीबी आणि क्रेन घेऊन शिरल्याची खबर लगेच कंपनीतील एका माजी कामगाराने बोईसर पोलिसांना फोन करून दिल्याची माहीती समोर आली आहे.मात्र चोरांना रंगेहात पकडण्यासाठी यावर पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याचा आरोप या कंपनीतील माजी कामगारांनी केला आहे.हा कारखाना बंद झाल्यानंतर कर्जाचे हफ्ते थकल्यानंतर सध्या बँकेकडे गहाण असून कामगारांची देणी सुद्धा कारखाना मालकाने थकवली आहेत.कारखान्यातील आत्तापर्यंत ८० टक्के यंत्रसामग्री चोरट्यांनी लांबवली असून या दरम्यान आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा आगीच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत.

औरा ऑईल कारखान्यातील चोरी आणि सिलेंडर स्फोट प्रकरणात बोईसर पोलिसांनी ३ संशयीत व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते. त्याचप्रमाणे चोरीच्या घटनेत वापरलेली क्रेन सुद्धा ताब्यात घेतली होती.कारखान्याच्या परीसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असून त्यांच्या आधारे पोलिसांना चोरटे आणि जेसीबी व क्रेन चालक यांचा माग काढणे सहज शक्य असताना त्याचप्रमाणे कामगारांनी संशयीतांची नावे दिली असताना देखील आत्तापर्यंत या घटनेतील चोरटे मोकाट फिरत असून यामुळे औद्योगिक वसाहतीमधील इतर भंगार चोरांना पोलिसांचे भय उरलेले नसून औद्योगिक क्षेत्रात खुलेआम भंगार चोरीच्या घटना घडत आहेत.

प्रतिक्रिया

खबर दाखल केली आहे कारवाई सुरू आहे -प्रदीप कसबे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बोईसर एमआयडीसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *