‘आयर्नमॅन’ हार्दिक पाटील यांना ‘मॅरेथॉन स्पर्धे’चा ‘फेस ऑफ द इव्हेंट’ बनवण्यास नकार!

वसई भाजप अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष तसनिफ शेख यांचा संताप

प्रतिनिधी

विरार- वसई-विरारकरांच्या जनभावनेचा अनादर करत अखेर ‘आयर्नमॅन’ हार्दिक पाटील यांना ‘मॅरेथॉन स्पर्धे’चा ‘फेस ऑफ द इव्हेंट’ बनवण्यासही महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नकार दर्शवला आहे. विशेष म्हणजे क्रीडा मंत्री गिरीश महाजन आणि खासदार राजेंद्र गावित यांच्या विनंतीवजा सूचना पत्राला आयुक्तांनी केराची टोपली दाखवली आहे. आयुक्तांच्या या बेजबाबदार आणि बेगडी क्रीडाप्रेमावर पुन्हा एकदा वसई-विरारकरांनी टीकेची झोड उठवली आहे.

वसई-विरार महापालिकेच्या वतीने ११ डिसेंबर रोजी ‘मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेवर पालिका कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. वसई-विरार शहराला जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करून देणाऱ्या ‘आयर्नमॅन’ हार्दिक पाटील यांना या स्पर्धेचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ बनवावे, अशी मागणी वसई भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तसनिफ शेख यांनी केली होती. मात्र ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ पदी आधीच अन्य खेळाडूची नियुक्ती करण्यात आल्याने आयुक्तांनी हार्दिक पाटील यांच्या नावाला असमर्थता दर्शवत ‘मॅरेथॉन स्पर्धे’दरम्यान त्यांचा सत्कार करण्यात येईल, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.

दरम्यानच्या काळात क्रीडा मंत्री गिरीश महाजन व खासदार राजेंद्र गावित यांनीही विनंतीवजा सूचना पत्राद्वारे हार्दिक पाटील यांच्या नावाचा पुनर्विचार करावा; किंबहुना त्यांना या स्पर्धेचे ‘फेस ऑफ द इव्हेंट’ बनवावे, अशी मागणी केली होती. हार्दिक पाटील यांनी जागतिक पातळीवर वसई-विरारचा नावलौकिक वाढवलेला आहे. जागतिक पातळीवर ते अनेक तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. विशेष म्हणजे ते भूमिपुत्र असल्याने त्यांच्या मातृभूमीत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचे प्रतिनिधित्व करण्याचा त्यांना हक्क आहे. मुळात वसई-विरार शहर आणि परिसरातील स्थानिक क्रीडापटूना प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. त्यामुळे हार्दिक पाटील हेच या स्पर्धेचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ ‘ किंवा ‘फेस ऑफ द इव्हेंट’ असले पाहिजेत, अशी वसई-विरारकरांची मागणी होती.

मात्र आयुक्त अनिलकुमार पवार यांनी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडत हार्दिक पाटील यांच्या नावाला नकार दर्शवला असल्याची टीका वसई भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तसनिफ शेख यांनी केली आहे.

महापालिका स्थापनेपासून ‘मॅरेथॉन स्पर्धे’वर बहुजन विकास आघाडी व त्यांच्या नेत्यांचा प्रभाव राहिला आहे. त्यांच्या सूचना आणि आदेशानेच या स्पर्धेचे नियोजन होत असल्याने विरोधी पक्षांकडून नेहमीच ही स्पर्धा टीकेचे लक्ष्य होत राहिलेली आहे.

आताही आयुक्त अनिलकुमार पवार त्यांच्याच इशाऱ्यावर नाचत आहेत. त्यांना स्वतःचे मत किंवा विचार राहिलेला नाही. ते नामधारी आयुक्त आहेत. त्यांनी जनभावनेचा अनादर करत बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची तळी उचलून धरलेली आहे. हार्दिक पाटील यांच्या नावाचा ‘फेस ऑफ द इव्हेंट’करता विचार करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आढावा बैठकीत त्या विषयी चर्चा करू, असे ते म्हणाले होते. मात्र एकाएकी त्यांनी दबावाला बळी पडत हा निर्णय फिरवला आहे.

या बैठकीला बहुजन विकास आघाडीचेच नेते उपस्थित होते, त्यांच्याच आदेशाने निर्णय झालेला आहे. या आधीही आयुक्तांनी महत्त्वाचे कार्यक्रम आणि अन्य सभांना वसईतील विरोधी पक्षांना डावललेले आहे. त्यामुळे आयुक्त जनतेचे सेवक नसून बहुजन विकास आघाडीच्या दावणीला आहेत, अशा शब्दात शेख यांनी आयुक्तांविरोधात संताप व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *