
प्रतिनिधी :
वसई तालुक्यात १५ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम नुकताच तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
वसई तालुक्यातील वासळई, रानगाव, तरखड, खार्डी, डोलीव, टेंभी कोल्हापूर, टिवरी, खोचिवडे, टोकरे, खैरपाडा, पाणजू, पारोळ, तिल्हेर, करंजोन, नागले, मालजीपाडा, कळंब या १५ ग्राम पंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी ५१ प्रभागात १४१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पडावी व निवडणुकीत कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
५५ मतदान केंद्रांवर ही निवडणूक होणार असून या निवडणुकीकरिता ४४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम गुरुवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.