
सुदृढ मुलालाही लाजवेल असा उत्साह दिव्यांग विद्यार्थ्यां मधे असून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे, आईवडिलांपेक्षा त्यांची जास्त काळजी घेणारे त्यांचे गुरुवर्य, शिक्षक यांचे मी कौतुक करतो.तसेच दिव्यांगा साठी मंत्रालय उभं
करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असल्याने मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करतो, असे सांगून या विद्यार्थ्यांसाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा जिल्हा परिषदेमार्फत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आज दिली.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आज स.तु.कदम विद्यालयाच्या क्रीडांगणा वर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, सभापती समाजकल्याण समिती,मनीषा निमकर, सभापती बांधकाम समिती संदेश ढोणे, सभापती महिला व बालकल्याण रोहिणी शेलार,सभापती कृषि व पशुसंवर्धन समिती,संदीप पावडे, जि.प.सदस्य पूर्णिमा धोडी, स.तु.कदम विद्यालयाचे विश्वस्त वाघेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर यांनी या स्पर्धा शहरी आणि ग्रामीण भागात घेण्यात याव्यात. तरच आपण या मुलांना न्याय देता येईल त्यांना प्रकाशझोतात आणता येईल.तसेच समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग मुलांसाठी पेन्शन योजना राबविण्यात यावी.असे यावेळी सूचित केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपंगांचे मेळावे घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
उपाध्यक्ष पंकज कोरे आणि बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे यांनीही दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
समाजकल्याण अधिकारी प्रवीण भावसार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.
विद्यार्थ्यांनी संचलन करून मान्यवरांना सलामी दिली.त्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते क्रीडा धवजारोहन करण्यात आले.मशाल रिले करून स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला.
या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील १५ शाळांचा समावेश होता. एकूण ३०० च्या आसपास मुलांनी खेळात सहभाग घेतला. धावणे, गोळा फेक, सॉफ्ट बॉल,पोहणे इ.स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या.