
नालासोपारा :- कोरोना काळात बंद असलेल्या महानगरपालिकेतल्या हजेरी मशीन्स आजतायगत सुरु झालेल्या नसल्यामुळे विविध प्रभागात कर्मचारी व अधिकारी कधीही येतात तसेच जेवणाच्या सुट्टीत अदृश्य होण्याचे प्रमाण जास्त आहे.
कर्मचारी वेळेत येण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध प्रभागा मधे थंम्ब मशीन्स लावल्या. यामुळे अंकात्मक नोंद संगणकावर होऊ लागल्या. कुठला कर्मचारी कधी येतो कधी जातो याचा वेळेनुसार तपशील उपलब्ध होऊ लागला. कार्यालयीन वेळेत न येता, कधीही येणारे लेट लतीफ नोंद वहीत चूकीची वेळ नोंद करून स्वाक्षरी करत असत त्यास यामुळे चाप बसला.
मात्र कोरोना काळात महामारीचे वाढते संक्रमण वस्तुला सार्वजनिकरीत्या स्पर्श झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे थंम्ब मशीन्स बंद करण्यात आल्या. त्याऐवजी पारंपारिक नोंदवही द्वारे हजेरी सुरु करण्यात आली. मागील २ वर्षापासून याच पद्धतीने हजेरी सुरु आहे.
त्याचा गैरफायदा पालिका कर्मचाऱ्यानी घेतला आहे. सकाळी नियोजित वेळेत न येणे, मध्यान्ह भोजनासाठी घरी जाऊन वामकुक्षी घेऊन संध्याकाळी आपल्या सोईने हजर होणारे महाभाग पालिकेत कार्यरत आहेत. त्यांच्यावर सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ते होत नसल्याने कर्मचारी मुजोर झाले आहेत. सदर मशिन्स बंद असून लवकरच मशीन्स सुरु करणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.