
मंजुरीची अजूनही प्रतीक्षाच…
महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या इलेक्ट्रिक वायरिंग,लिफ्ट, पाणीपुरवठा योजना,कुंपण आणि ऑक्सिजन पाइपलाइनसारख्या कामांसाठी 36 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे केली आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीकडून 36.25 कोटी रकमेच्या मंजुरीची अजूनही प्रतीक्षाच आहे.
महामार्गावर अपघात घडल्यानंतर जखमी व्यक्तींसाठी मनोर येथील ट्रामा केअर सेंटर हे वरदान ठरणार आहे तसेच ग्रामीण भागातील रुग्णांनाही या ड्रामा केअर सेंटरचा मोठा उपयोग होणार आहे मात्र शासनाचा निधी येत नसल्यामुळे या ट्रॉमा केअर सेंटर सुरू होण्यासाठी पुढचा पावसाळा उजाडणार असेच चित्र दिसत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारत बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. 200 खाटांचे ट्रामा केअर सेंटरची रखडपट्टी कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे हाल कायम आहेत. महामार्गालगत निर्माणाधिन ट्रामा केअर रुग्णालयाची इमारत उभी झाली असली तरी कुंपण,फर्निचर,लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा,घरगुती गॅस,ऑक्सिजन पाईपलाइन,पाणीपुरवठा योजना आणि इलेक्ट्रिक वायरिंगच्या कामासाठी निधी नाही.
सध्या इमारतींचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून मार्च पर्यंत उर्वरित काम पूर्ण होणार आहे, मात्र निधी अभावी महत्वाची कामे रखडणार आहेत. 2017 ला 200 खाटांचे रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरच्या निर्मितीसाठी 50 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर 2019 मध्ये रुग्णालयाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते.रुग्णालय मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत टेन ग्रामपंचायत हद्दीतील टाकवहाल गावच्या हद्दीत सरकारी जागेत सेंटर बांधले जात आहे. महामार्ग अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी दोनशे खाटांचे सेंटर उभे करण्याची संकल्पना समोर आली होती.रुग्णालयासाठी एकूण 61 कोटी रुपयांच्या निधीला 15 एप्रिल 2017 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.10 नोव्हेंबर 2018 रोजी 50 कोटी आणि 03 नोव्हेंबर 2018 रोजी 11.19 कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यानंतर ठेकेदाराला 08 मार्च 2019 रोजी कार्यादेश देण्यात आले होते.ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामासाठी नोव्हेंबर 2022 पर्यंत 3280 लक्ष रुपये खर्च झाले आहेत.
मनोर येथील महामार्गावर सेंटर बनवण्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अति आजारी रुग्णांना हक्काचे रुग्णालय नसल्यामुळे गुजरात,दादरा नगर हवेली अथवा मुंबई येथे हलवण्यात भाग पडत आहे. हे ट्रामा सेंटरचे काम लवकर पूर्ण करून सेवा सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
असा निधी आवश्यक
◆11℅ इलेक्ट्रिक वायरिंग 6 कोटी 58 लाख
◆रेन वाटर हार्वेस्टिंग 16 लाख
◆अग्निशमन सुविधा 2.03 कोटी
◆फर्निचर 11.87 कोटी
◆गॅस पाइप लाइन ऑक्सिजन पाइपलाइन 3.51 कोटी
◆बायो डायजेस्टर 70 लाख
◆कुंपण आणि प्रवेशद्वार 1.50 कोटी
◆बगीचा आणि समतल जागा निर्मिती 10 लाख
लिफ्ट 2.69 कोटी
◆AB रूम,परिसर विद्युतीकरण, पंप आणि जनरेटर 2.53 कोटी
◆सीसीटीव्ही65 लाख
◆पाणीपुरवठा योजना 33 लाख
◆जीएसटी 3.88 कोटी
◆10℅ दर वाढ 3.23 कोटी
◆आर्किटेक्चर कन्सल्टन्सी-सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर-मुंबई.
◆रुग्णालयात विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांकडून सेवा दिली जाणार आहे.अपघात विभाग,शवविच्छेदन केंद्र,बाह्य रुग्ण आणि तपासणी विभाग,तसेच 20 खाटांचे ट्रामा केअर सेंटर तळमजल्यावर सुरु केले जाणार आहेत.
■रुग्णालयाचे एकूण बांधीव क्षेत्र 19 हजार 675 चौरस मीटर आहे. तळमजला व वाहनतळ मिळून 2 हजार 536 चौरस मीटर क्षेत्र असून त्यातील 256 चौरस मीटर क्षेत्र वापराखालील असणार आहे. या इमारतीचा तळमजला 3 हजार 266 चौरस मीटर, पहिला मजला 3 हजार 761 चौरस मीटर, दुसरा मजला 3 हजार 711 चौरस मीटर, तिसरा मजला 3 हजार 711 चौरस मीटर तर चौथा मजला 2 हजार 600 चौरस मीटर इतका असणार आहे.