
आता पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात
नालासोपारा :- श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. हत्येच्या थरारक घटनेनंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे. तुळींज आणि माणिकपूर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. श्रद्धाचे वडील विकास यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश काढल्याचेही सूत्रांकडून कळते.
आरोपी आफताबने मारहाण केल्यानंतर श्रद्धाने तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळेच पुढील संतापजनक प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. हा मुद्दा श्रद्धाचे वडील विकास यांनी उपस्थित करत पोलिसांच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता या प्रकरणातील बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
श्रद्धाने जेव्हा तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती त्यावेळी तिला मेडिकल करून येण्यास सांगितले पण ती आलीच नाही. तसेच तिला अनेक वेळा तुळींज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर ती आली व आफताब बाबत काहीही तक्रार नसल्याचा जवाब पोलिसांना दिलेला आहे. तिच्या वडिलांनी पोलिसांवर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून योग्य चौकशी व तपास केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.