
नालासोपारा :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आय प्रभाग मधील बाजार कर वसूलीत पराकोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाजार कर वसूलीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आयुक्त अनिलकुमार पवार यांनी विविध प्रभागात बाजार कर वसुलीचे मोठे फ्लेक्स लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी पालिकेचे दर पत्रक लावण्यात आले. सदर फ्लेक्स शनिवारी रात्री फाडून नष्ट करण्यात आले आहेत.
अधिक माहिती नुसार आय प्रभागात चुकीच्या पद्धतीने बाजार कर वसूली मागील काही वर्षापासून सुरु आहे. १० रुपये वसूली ऐवजी २०० रुपये वसूली केली जाते. त्याची रितसर पावतीही दिली जात नाही. पावती मागितली असता वसूली कर्मचारी विक्रेत्यास दमदाटी करतात. अगदीच आग्रह धरला तर जूनी कमी दराची पावती सादर केली जाते.
यातून मासिक अडीच ते तीन लाख रुपये वसूल केले जातात. हे पैसे ठेकेदार व पालिका अधिकारी यांच्या खिश्यात जातात. पालिकेला यातून अतिशय अल्प उत्पन्न मिळते. याविरोधात वसई जनरल लेबरच्या उपाध्यक्ष अभिलाषा वर्तक यांनी पालिककडे याबाबत तक्रार करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर पालिकेने दरफलक लावण्याचे निर्णय घेतले होते.
मात्र अज्ञाताने पापडी पोलीस चौकी च्या बाजूला असलेला फ्लेक्स फाडून यामधे मुख्य दर विक्रेत्याना समजू नये हा उद्देश्य उघड झाला आहे. पालिका प्रशासनाने शासकीय मालमत्तेची नासधुस केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणे कमप्राप्त आहे. याबाबत वसईतील काही नागरिकांनी आयुक्त पवार यांना याबाबतचे फोटो पाठवून कारवाईची मागणी केली आहे.
पालिका आयुक्त पवार यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी पुढील कारवाईसाठी माहिती घेत असल्याचे सांगितले आहे.