वसई भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तसनीफ शेख यांची मागणी

नालासोपारा :- निसर्गसंपन्न म्हणून वसईच्या पश्चिम पट्ट्याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी अनधिकृत बांधकामे या निसर्गसंपन्नतेला बाधा पोहोचवत आहेत. या बांधकामांमुळे शहराला बकालपण येत आहे. याबाबत वसई भाजपच्या माध्यमातून वसई-विरार महापालिकेच्या ‘आय` प्रभागात अनेक तक्रारी देण्यात आलेल्या आहेत, मात्र या प्रभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील या तक्रारींवर कार्यवाही करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी वसई भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तसनीफ शेख यांनी नगरविकास खाते व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

मागील दोन वर्षांत वसई-विरार शहरात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांनी डोके वर काढले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावले आहे. अनधिकृत बांधकामे थांबवण्याकरता पालिका करत असलेल्या उपाययोजनांची विचारणा न्यायालयाने केलेली आहे. त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होताना दिसत आहेत.

शहराचा पूर्व पट्टा अनधिकृत बांधकामांमुळे बदनाम झालेला आहे. आता निसर्गसंपन्न असलेला पश्चिम पट्टाही यातून सुटलेला नाही. मागील दोन वर्षांत या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. या संदर्भात जागृत नागरिकांनी सातत्याने वसई-विरार महापालिकेच्या ‘आय` प्रभागात तक्रारी दिलेल्या आहेत. या तक्रारींवर नोटीस बजावण्यापलीकडे पालिका कोणतीही कार्यवाही करत नसल्याने अनधिकृत बांधकामधारकांना पालिकेचा धाक राहिलेला नाही. वसई भाजपनेही सातत्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांकडे पालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र देशात सत्ता असलेल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांनाही पालिकेचे अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जुमानत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

तसनीफ शेख यांनीही प्रत्यक्ष व पत्रव्यवहाराद्वारे शहरात होणारी अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवर झालेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण व अन्य समस्यांबाबत पालिकेच्या ‘आय` प्रभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने शेख यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची भेटही घेतलेली आहे. मात्र त्यांच्या कोणत्याच तक्रारीवर आजपर्यंत त्यांनी कार्यवाही केलेली नसल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *