विरार, सोमवार दिनांक :- १९ डिसेंबर, २०२२  :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वॉलमनच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.  वसई -विरार शहरातील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित कामांच्या संदर्भात काल हितेश जाधव यांनी आयुक्तांची भेट घेतली होती.
          तत्कालीन आयुक्त गंगाधरन यांनी त्यांच्या कार्यकाळात वर्ष २०२० मध्ये वॉलमनच्या बदल्या करण्यात आल्या  होत्या. शहर अभियंता राजेंद्र लाड यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले होते. यास आजमतीस २ वर्षाहून अधिक कालावधी लोटला असताना देखील या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. या आदेशात नमूद एकही वॉलमनची बदलीच्या ठिकाणी नियुक्ती झालेली नाही. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट सुरु असून पालिकेचे वॉलमन आणि पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांचा मनमानी कारभार सुरु आहे. पालिकेचे वॉलमन वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी स्वतःची सेटिंग लावून बसले आहेत. अनेक ठिकाणी सोसायटीकडून पैसे घेऊन पाणी सोडले जात आहे. कोणाच्या सोसायटीला जास्त पाणी सोडायचे आणि कोणाच्या सोसायटीला कमी पाणी सोडायचे याचे जणू कंत्राटच या वॉलमन ने घेतले आहे. विशेष बाब म्हणजे यापैंकी कुंदन गावंड, संजय आळेकर, नितीन पाटील, मिलिंद पाटील, उपेंद्र धामणे, संजय गुरव या ६ वॉलमनची नियुक्ती एकाएकी रातोरात करण्यात आली असल्याची बाब हितेश जाधव यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. पालिकेचे हे वॉलमन पगार पालिकेचा घेतात मात्र काम स्थानिक नेतेमंडळीच्या घरचे करतात असा गंभीर आरोप हितेश जाधव यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी सर्व वॉलमनची  सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी हितेश जाधव यांनी आयुक्तांकडे केली.
            वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभागात सध्या कार्यरत असलेल्या वॉलमनची सखोल चौकशी करून प्रत्येक वॉलमनची सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्काळ बदली करण्यात यावी त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार त्यांची संख्या निश्चित करण्यात यावी, तसेच रिकामी वेळेत त्यांच्यावर पाणीपुरवठा विभागातील इतर कामे सोपविण्यात यावीत अशी मागणी हितेश जाधव यांनी आयुक्तांकडे केली आहे. पुढील काळात ३ ठेकेदारामार्फत पाणीपुरवठा विभागाची कामे करून घेण्याचे ठरले असून आता प्रत्येक ३ ते ६ महिन्यातून एकदा सर्व वॉलमनच्या बदल्या करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आले असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी स्पष्ट  केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *