
पोलिस अधिकाऱ्यांना पडला प्रश्न
नालासोपारा :- होणार होणार असे म्हणत अखेर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या आणि अंमलदारांच्या बदल्यांचा मुहूर्त अद्यापही सापडलेला नाही. पोलिस कर्मचारी ते सहायक पोलिस उपनिरीक्षकांपर्यंतच्या बदल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या आहेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोन वर्षाचा कालावधी उलटूनही एक वर्षाचा कार्यकाळ लोटल्याने अंतर्गत बदल्या न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनेक पोलिस आयुक्तालयात कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधरण बदल्या सुरू आहेत पण मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नव्याने आलेले आयुक्त मधुकर पांडे केव्हा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. पोलिस स्टेशनमध्ये साधरणत: दोन वर्षे व अन्य शाखेत तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेला अधिकारी बदलीस पात्र असतो. पोलिस स्टेशन व अन्य शाखेत कार्यकळ पूर्ण झाल्यानंतर अजूनही या अधिकाऱ्यांची बदली झालेली नाही. पन्नासपेक्षा अधिक अधिकाऱ्यांची बदली होणे अपेक्षित आहे. काहींना मुलांच्या शाळेचा प्रश्नही भेडसावत असून, या अधिकाऱ्यांनी मुलांचा शाळेत तात्पुरता प्रवेश घेऊन ठेवला आहे. आता अचानक बदली झाल्यास त्यांना संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शाळेत प्रवेश मिळणार किंवा नाही, या विवंचनेत पोलिस अधिकारी आहेत. राज्यभरातून बदली झालेले अनेक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात हजर झाले आहेत. नव्याने आयुक्तालयात रुजू झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची ‘साइड ब्रॅन्च’ला पहिली पसंती आहे. आयपीएस अधिकारी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता होती. आठवडाभरानंतही या बदल्यांचा मुहूर्त निघालेला नाही.