नालासोपारा :- रानगाव तीवरतोड प्रकरणी खाजगी विकासकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तहसीलदार कार्यालयाने सुरु केली आहे. पतन विभागाची दिशाभूल करून महाराष्ट्र शासनाच्या जागेत माती, रेबिट भराव करून बांधकाम करण्यात आले होते. तसेच रविवारी शासकीय सुट्टीचे दिवशी संधी साधुन जेसीबी लावून नव्याने भराव करण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

येथील सर्वे क्रमांक ३६ हे शासकीय कांदळवन सरंक्षित महाराष्ट्र शासनाची जागा आहे. या जागेवर पतन विभागाच्या वर्क ऑर्डरचा गैरवापर करून बांधकाम सुरु करण्यात आले. सदर वर्क ऑर्डरनुसार ठेकेदार युवराज मोहिते यांस या बांधकामाचा ठेका देण्यात आला आहे. सदर विकासकाम रानगाव रामआळी येथे विकसित करण्याचे आदेश असताना येथून एक किलोमीटर अंतरावर शासकीय जागेत तिवरांची तोड करून बेकायदा विकासकाम करण्यात आले. या प्रकरणी ‘हरित लवाद’ प्राधिकरणाकडे तक्रार दाखल आहेत.

३ डिसेंबरला ही बाब काही नागरिकांनी निदर्शनास आणल्यावर तहसीलदार उज्वला भगत, नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी जागेवर पोहोचुन हे काम बंद केले होते. मात्र रविवारी जेसीबी लावून पुन्हा भराव सुरु झाल्याची बाब निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी पालघर व तहसीलदार वसई यांना पुन्हा तक्रार देण्यात आल्या आहेत.

याबाबत तहसीलदार उज्वला भगत यांना विचारणा केली असता, तहसीलदार कार्यालयाने प्रकरणाचा अहवाल प्रांत अधिकारी कार्यालयात सादर केल्याची तसेच त्यानुसार संबधिता विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. वनविभागाच्या पंचनाम्याची तजवीजही करण्यात येणार आहे. शिवाय पतन विभागाला याबाबत पत्र देऊन अवगत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

घेराव आंदोलनाचे आयोजन

संपूर्ण प्रकरणात तलाठी सजा कौलार अमित राठोड यांची भूमिका संशयास्पद दिसत आहे. राठोड यांना संबधित ठेकेदार व अन्य घटक यांनी पंचनामा करू दिला नाही. शिवाय दमदाटी केली असे असताना शासकीय कामकाजात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता त्यांना क्लीन चिट देण्यात आली.

तहसीलदार कार्यालयात पंचनामा सादर केला. त्यात झाडांची कत्तल झाल्याचे मान्य करण्यात आले आहे मात्र तिवरांच्या झाडांची कत्तल झाल्याचे मान्य न केल्याने या पंचनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या भ्रष्ट वृत्तीविरोधात येत्या दिवसांत ‘मी वसईकर’ अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर घेराव आंदोलन करणार असल्याचे लोकमतला बोलताना जाहिर केले. आंदोलनाची रूपरेषा व निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *