नालासोपारा : मुंबई गुजरातला जोडणाऱ्या भाईदर खाडीवरील बांधकाम सुरू असलेल्या नवीन वर्सोवा पूलाच्या गर्डर तडे गेल्याचे आढळून आले आहे. पुलाच्या गर्डरची रचना कमकुवत असल्याने पूल धोकादायक बनल्याचा आरोप पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केला. पुलाच्या बांधकामस्थळीच अधिकार्‍यांना पूलातील दोष दाखवून दिले. यावर अधिकार्‍यांनी आवश्यक तो बदल करण्याचे आश्वासन दिले आहे.

भाईंदर खाडीवर वाहनांसाठी मुंबई आणि गुजरात ला जोडणारा पूल मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा तर्फे तयार करण्यात येत आहे. या पूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच पुलाची संरचना सदोष असल्याचा आरोप खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. या पूलाच्या पाहणीसाठी त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलिसांना घेऊन पूलाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. गावित यांच्या खासगी वास्तुविषारदांनी पूलाच्या कामातील दोष दाखवून दिले. पूलाचे बांधकाम झाल्यानंतर त्याला गर्डर टाकण्यात येत आहे. त्यामुळे पूल कमकुवत होणार असून तो सुरू झाल्यावर वाहनांचा भार सहन करू शकणार नाही असे वास्तूविषारदांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र नाशिकच्या धर्तीवर या पूलाचे काम सुरू असून नंतर गर्डर बसविल्याने पुल कमकुवत होणार नसल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला. तरी देखील तज्ञामार्फत तपासणी करून योग्य तो बदल केला जाईल असे आश्वासन राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे सल्लागार सारंग चपळगावकर यांनी दिले.

दरम्यान या पूलाला तडे पडल्याचे आम्ही अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. पुलाच्या गर्डरची रचना चुकीची आहे. त्यामुळे पूल कमकुवत होणार आहे. त्यावर भविष्यात अपघाताचाही धोका उद्भवू शकतो. पूलाचे आयुष्यमान देखील केवळ ५० वर्षांचे आहे. ही अत्यंत संतापजनक बाब आहे
राजेंद्र गावित-खासदार पालघर
दरम्यानराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक मुकुंदा अत्तरडे यांनी
ज्या ठिकाणी तडे पडले आहेत त्याची दुरूस्ती केली जाईल. मात्र पुलाच्या गर्डरच्या रचनेत दोष नाही. तरी देखील तज्ञ अभियंत्याच्या मार्फत पुलाची पाहणी करून आवश्यक तो बदल केला जाईल असे मुकुंदा अत्तरडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *