पत्रकार संरक्षण कायदा हे पत्रकारांचे सुरक्षा कवच

— ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड यांचे प्रतिपादन

वसई, दि.6 (प्रतिनिधी )

आद्य संपादक स्व.बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून, आज वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी ‘पत्रकार संरक्षण कायदा’ व ‘बातमीतील शुद्धलेखन’ याविषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन वसईत करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे, तथा व्याख्याते म्हणून दै. लोकमतचे वसई-पालघर आवृतीप्रमुख, तथा ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड आणि मराठी व्याकरणाचे अभ्यासक, तथा जेष्ठ पत्रकार शरद विचारे उपस्थित होते.

     वसई पश्चिमेच्या निर्मळ येथील 'उषःकाल' विश्रामगृह सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी

पाहुण्यांच्या हस्ते स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विविध वृत्तपत्रे आणि दुरचित्रवाहिनींचे तालुक्यातील विविध पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

       राज्यसरकारने सन २०१७ मध्ये पारित केलेला पत्रकार संरक्षण कायदा हा पत्रकारांसाठी सुरक्षा कवच ठरला आहे. कारण २०१७ पूर्वी महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्याचे जे प्रमाण १० टक्के होते, ते या कायद्यानंतर तीन टक्क्यांपर्यंत आले आहे. या कायद्यातील तरतुदींमुळे पत्रकारांना हे संरक्षण मिळाले आहे. तथापि, पत्रकारिता करताना निर्भीडपणे आणि निस्पृहपणे पत्रकारांनी आपली सेवा बजावावी. तटस्थपणे पत्रकारिता केली तर या क्षेत्रात आपले शत्रू निर्माण होणार नाहीत आणि आपल्याला पत्रकारितेच्या तत्त्वाला मुरडही घालता येणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जगदीश भोवड यांनी यावेळी केले.

           शुद्धलेखन हा बातमीचा आत्मा असून, आपण नेहमीच बातम्यांद्वारे शुद्धलेखनाच्या सान्निध्यात असतो. आपण जे लिहितो त्याचा समाजमनावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपल्या लेखनात शक्य तितका शुद्धलेखनाचा अवलंब करावा. इतर कुणी आपले लेखन सुधारेल यापेक्षा आपणच आपली बातमी शुद्ध स्वरूपात आणि गोळीबंद स्वरूपात द्यावी. त्यामुळे आपल्या बातम्या प्रसिद्ध होण्यास सुकर होतील आणि बातम्यांचे समाधानही मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शरद विचारे यांनी याप्रसंगी केले.

      'दर्पण' हे देशातील पहिले मराठी नियतकालिक सुरु करणारे स्व. स्व.बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक मानले जात असून, त्यांनी अल्पवयात विविध क्षेत्रात प्रचंड मोलाचे योगदान दिले आहे. यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर स्व. जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच, पत्रकारांना सहाय्यभूत ठरेल असे विषय घेऊन आज मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी प्रस्ताविकात सांगितले.

      पत्रकार संघातर्फे भोवड आणि विचारे या दोघा ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. संघाचे पदाधिकारी विजय खेतले आणि विश्वनाथ कुडू यांनी प्रारंभी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी उपस्थित विविध नियतकालिकांच्या महिला संपादिका सौ. सोनल महाडिक, सौ. सुनीता पाटील, सौ. पूजा रोकडे व सौ. कल्पिता भोईर यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संघाचे सरचिटणीस शशी करपे, विजय देसाई, प्रसाद जोशी, सुनील घरत, चंद्रकांत भोईर, प्रथमेश तावडे, विपुल पाटील, रुपेश वाडे, लक्ष्मण पाटोळे, मच्छिन्द्र चव्हाण, बबलू गुप्ता, हरिश्चंद्र गायकवाड आदी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *