
सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस पुन्हा वादात
विरार(प्रतिनिधी)-पालिका क्षेत्रात आजपर्यंत बांधकाम माफियांकडून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत होती. परंतु आता चक्क पालिकेतील सहा.आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांकडूनच अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर येऊ लागले आहे. मध्यंतरी प्रभाग समिती एच चे सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस यांनी प्रभाग समिती आय चे तत्कालीन सहा.आयुक्त व्हिक्टर डीसोझा यांना अनधिकृतपणे बंगल्याचे बांधकामा केल्या प्रकरणी नोटीस बजावली होती.त्यानंतर आता सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस यांनाच प्रभाग समिती आय चे सहा.आयुक्त महेश पाटील यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमध्येच नोटीस ‘वॉर’ सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.विशेष म्हणजे दोन आठवड्यापूर्वी सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस विरोधात मनसेने पक्षाचे झेंडे हटविल्याने आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले होते.पालिकेने त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी तात्पुरती बदलीची कारवाई करून पुन्हा ३ दिवसांनी त्याच पदावर विराजमान केले होते.परंतु
अनधिकृतपणे बंगल्यांचे प्रकरणं समोर आल्याने सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस हे पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
प्रभाग समिती आय हद्दीत होळी परिसरात रमेदी, घोगाळेवाडी येथे मौजे सांडोर सर्वे नं ९९/३/१ या जागेवर ४ बंगल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. सदरचे बंगले हे अनधिकृत पणे बांधण्यात आल्याचा प्रभाग समिती आय चे विध्यमान प्रभारी सहा.आयुक्त महेश पाटील यांना संशय आहे.त्यामुळे त्यांनी सातबारा अभिलेखात नोंद असलेल्या सहा.आयुक्त ग्लिसन नॉमस घोन्साल्वीस तसेच त्यांचे नातेवाईक गीता ग्लिसन घोन्साल्वीस,निखिल ग्लिसन घोन्साल्वीस,प्रियल ग्लिसन घोन्साल्वीस यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६० व ४७८ अन्वये नोटीस जारी करून ७ दिवसांत बांधकाम परवानगी संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची नोटीस जारी केली आहे.परंतु सदरची नोटीस स्वीकारण्याचे सौजन्य सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस यांनी दाखवले नाही.त्यामुळे नोटीस देण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांवर बंगल्याच्या बाहेर २ दिवस ठाण मांडुन बसण्याची वेळ आली.वास्तविक अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवणारी पालिका आता सहा.आयुक्तांच्या अनधिकृत बांधकामांवर काय कारवाई करतात? याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.