
नालासोपारा :- मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचा लाचेचा आकडाही लाखो, कोटींच्या घरात असतो. प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण असून राज्यभरात लाच घेताना दररोज एखादा तरी कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात अडकत आहे. त्यातही सर्वाधिक लाचखोरी महसूल, मनपा विभागात दिसून येते. तर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस विभागातही लाचखोरीची गंभीर समस्या आहे. सरकारी कार्यालयात टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय झटपट कामेच होत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. अन्यथा कामे प्रलंबित ठेवली जातात. मग कामाला दांडी मारून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ येत असल्याने लाच देण्याशिवाय नागरिकांपुढे दुसरा पर्याय नसतो.
लाचखोरीत सापडले कोण
२०२१ २०२२
क्लास वन :- ३ ५
क्लास टू :- ५ ३
क्लास थ्री :- ८ ७
क्लास फोर :- १ ०
लाचखोरीचे गुन्हे वाढले
लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी २०२१ पेक्षा २०२२ मध्ये जास्त लाचखोरांना अटक केली असून गतवर्षीपेक्षा यावर्षात लाचखोरी वाढली. सन २०२१ मध्ये १२ केसेस करून १८ लाचखोरांना अटक केली. तर सन २०२२ मध्ये २१ केसेस करत ३६ लाचखोरांना अटक केली आहे.
साहेब नामानिराळे, कर्मचारी अडकले
अनेकदा अधिकारी थेट लाच घेत नाहीत. एजंट किंवा मध्यस्थामार्फत लाचेची रक्कम आपल्यापर्यंत सहज पोहचेल अशी सोय अधिकाऱ्यांनी केलेली असते. म्हणजेच सर्व काही प्लॅनिंगनुसार लाचेचे आर्थिक व्यवहार सुरू असतात. त्यामुळे साहेब नामानिराळे लाच घेताना कर्मचारी अडकले.
लाच घेणे व देणे गुन्हा
‘लाच घेणे आणि देणे’ कायद्याने गुन्हा आहे. याबाबतची सरकारी कार्यालयात पोस्टर लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती केली जाते. मात्र ‘वरकमाई’साठी हपालेल्या ‘सरकारी बाबूं’वर जनजागृतीचा कोणताही परिणाम होत नाही.
लाच मागतोय, करा तक्रार
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधा. ई मेल dypacbpalghar@gmail.com, टोल फ्री नंबर – १०६४, दूरध्वनी क्रमांक – ०२५२५ – २९७२९७ आणि व्हॉट्सअप क्रमांक – ९९२३३४६८१०, ८००७२९०९४४
कोट
सरकारी कर्मचाऱ्याने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ किंवा मागू नये. लाचेची कोणी मागणी करत असेल तर तक्रार करावी. त्याची पडताळणी करूनच संबंधित सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. दरवर्षी याकरिता विभागाकडून जनजागृती करण्यात येते. – नवनाथ जगताप (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध, पालघर)