छत्रपती शिवाजी महाराजांची 393 जयंती रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, व्यवस्थापन परिषद दालन, विद्यानगरी,सांताक्रुज(पूर्व) येथे सकाळी दहा वाजता कुलसचिव मुंबई विद्यापीठ यांच्या परिपत्रकानुसार साजरी करण्यात आली. याप्रसंगी अधीसभा, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद यांचे सदस्य,विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी ही उपस्थित होते. या जयंतीच्या निमित्ताने डॉ.चंद्रकांत चव्हाण ,माजी अध्यक्ष, इतिहास अभ्यास मंडळ ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ यांनी डॉ. चंद्रकांत चव्हाण सर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना डॉ.संदेश वाघ, इतिहास विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती केली हे नम्रपणे नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली प्रशासन व्यवस्था ही अत्यंत उपयुक्त स्वरूपाची होती आणि या प्रशासन व्यवस्थेमुळेच महाराष्ट्रात सुराज्य निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत झाली असे त्यांनी नमूद केले
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक या विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून परकीयांवर विजय प्राप्त केला.छत्रपती शिवाजी महाराज यांची केंद्रीय व प्रांतिक स्तरावरील प्रशासनिक व्यवस्था ही लोककल्याणकारी होती.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी प्रशासन हे अद्वितीय होते त्यांनी आरमाराच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीमध्ये परकियावर वर्चस्व गाजवले. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त अशी व्यवस्था निर्माण केली. शिवरायांचे प्रशासन उत्कृष्ठ होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेतली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये विविध प्रकारच्या शत्रूंना तोंड देत एत्तदेशियांचे स्वराज्य निर्माण केले. त्यांची जमीन आणि महसूल प्रशासन व्यवस्था ही मानवकेंद्री होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा असे संबोधले जाते असे सांगितले
तसेच ते पुढे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन हे समाजाभिमुख होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सा.प्र.वि.चे उपकुलसचिव श्रीयुत घूले यांनी अथक प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *