
वसई तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या बैसिन कैथोलिक को ऑप बँक लि. च्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून देण्यात आल्यामुळे बँक खातेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, बैसिन कैथोलिक को. ऑप. बँक लि. मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्या प्रकरणी सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रारी गेल्या असून या बाबत लेखा परीक्षण अहवालातून घोटाळा उघडकीस आला आहे. सहकार आयुक्तांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षकांकडून सदरबाबत अहवाल मागितला होता. सन 2021-22 या आर्थिक वर्षात बैसिन कैथोलिक को ऑप बँक लि. या बँकेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी २३३ कर्ज प्रकरणांमध्ये येणे बाकी रुपये २५,२५,११,६१३/-पैकी रुपये २१,३९,00,५४१/-ची वसुली करून मान्यता प्राप्त पॉलिसी नसताना बँकेने मुद्दल रक्कम व व्याज रक्कम मिळून रुपये ३,९४,४६,0२१/- एवढी सूट देऊन बेकायदेशीरपणे कर्जाची तडजोड केल्याचे दिसते. त्यामुळे बँकेचे अंदाजे रुपये ३,८६,११,0९२/- एवढे आर्थिक नुकसान झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात नमूद आहे. २३३ कर्ज प्रकरणांमध्ये तडजोड केलेल्या आर्थिक नुकसानीची अंदाजे रक्कम रुपये ४,२४,५५,६0९/- एवढी असून सूट ओटीएस लेजर बेलेन्स प्रमाणे आर्थिक नुकसान रक्कम रुपये ३,९४,४६,0२१/- एवढी दिसते. ओटीएस लेजर बेलेन्स व कर्ज खाते स्टेटमेंट यातील तफावत अंदाजे रुपये ५८,८९,३४१/- एवढी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. इंद्रजीत चड्ढा यांचे विविध ७ कर्ज प्रकरणे २३३ कर्ज प्रकरणांमध्ये समाविष्ट असून त्यांचे एकत्रित ७ कर्ज प्रकरणांना संचालक मंडळ सभा दि. २७/८/२0२१ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. या मध्ये अंदाजे रुपये ८५,८८,३१६/-एवढी सूट देऊन इंद्रजीत चड्ढा यांची एकत्रित कर्ज प्रकरणांमध्ये तडजोड केल्याचे दिसते. तसेच जुनी कर्ज खाती बंद करून त्यांना रुपये १४५.00/- लाखांचे नव्याने कर्ज दिल्याचे दिसते. इंद्रजीत चड्ढा यांना दिलेली सूट नियमबाह्य असून त्यामुळे बँकेस आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांच्या अहवालानुसार शैलेश कोतमिरे अपर निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी सदर घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याकरिता दिनेश चंडेल, उप निबंधक, सहकारी संस्था, डोंबिवली यांची नेमणूक केली असून ३ महिन्यात त्यांना अहवाल सादर करायचा आहे.
बैसिन कैथोलिक को ऑप बँक लि. या बँकेचा सदर घोटाळा उघडकीस आल्यामुळे खातेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.