नैसर्गिक नाले बुजवणे, अनधिकृत बांधकामे, बेकायदा टॉवर्स, विकास कामांना खीळ असे प्रश्न

पालघर नगरपरिषद हद्दीतील नैसर्गिक नाल्यावर बिल्डर व बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम केली आहेत. अनेकदा तक्रारी करूनही नगरपरिषद दाद देत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवक प्रवीण मोरे नगरपरिषद कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसले आहेत.

नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये पूर्वापार पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले अस्तित्वात होते. मात्र आता अनेक बांधकामे उभी राहत असताना हे नाले बुजविण्याचा प्रताप करत आहेत. नैसर्गिक पाण्याचा निचरा व्यवस्थापन करणारे हे नाले काही ठिकाणी बुजवले तर काही ठिकाणी अरुंद झाले. यामुळे पाऊस पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होऊन पालघरमध्ये पूरस्थिती निर्माण होणार आहे, असे उपोषणकर्ते प्रवीण मोरे यांनी म्हटले आहे. ठोस कारवाई करण्याचे आश्वासन मिळणार नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी नगरपरिषदेला दिला आहे.

पालघर पूर्वेकडील पूनम पार्क रस्त्यावरील पृथ्वी हाउसिंग आणि लँड डेव्हलपर या विकासकाने नैसर्गिक नाल्यावर बांधकाम करून तो अरुंद केला आहे. याच भागामध्ये नमो श्रीवास्तु गृह निर्माण संकुल उभारताना अनधिकृत बांधकाम करून तेथेही नाला बुजवण्याचा प्रकार करण्यात आला आहे. नवली हनुमान टेकडी भागामध्ये अनधिकृत मोबाईल नेटवर्कचा मनोरा उभारण्यात आला आहे. काठेपाडा येथील लोकवस्तीमध्ये असलेल्या रस्त्यावर सेलो डेव्हलपर्स यांनी रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम केले असून रस्ता अडवला आहे. मोतीलाल तिवारी, सेंट जॉन महाविद्यालयाजवळ विलोई डिस्टलरीजने केलेले अनधिकृत बांधकाम तसेच पूर्व भागात प्रभाग क्रमांक चारमध्ये समाज मंदिर स्मशानभूमी व्यायाम शाळा आदिवासी विकास योजना चौकशीर्भीकरण रस्ते व गटार आदी विविध विकास कामे थांबून राहिल्याबाबत अनेक तक्रारी प्रवीण मोरे यांनी केल्या आहेत.

नाल्यांवरील अनधिकृत बांधकामाविषयी सदोषपणासमोर आल्यानंतर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये अनेक वेळा कारवाईची आश्वासने देण्यात आली होती. मात्र नागरपरिअहंडेकडून कारवाई झालेली नसल्यामुळे नगरसेवक प्रवीण मोरे यांनी या सर्व विषयांवर उजेड टाकत बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांमध्ये संबंधित वास्तुविशारदांनी तांत्रिक बाबी तपासणी आवश्यक असताना तसे न करता भूमी अभिलेख व नगरपरिषदेने संगणकाने हे नाले बुजवण्याचे काम केल्यामुळे या वास्तुविशारदांच्या सनदी रद्द करण्याच्या पावले नगरपरिषदेने उचलावी अशी मागणीही मोरे यांनी केली आहे. विविध विषयांवर केलेल्या तक्रारी या वैयक्तिक सोडवण्यापेक्षा जन सुनावणी घेऊन या तक्रारी प्रशासनाने सोडवाव्यात अशी प्रमुख मागणी मोरे यांनी केली आहे.

नगरसेवक प्रवीण मोरे यांनी याविषयी अनेक वेळा सर्वसाधारण मासिक सभेच्या विषयामध्ये हे विषय मांडले होते आश्वासने देण्यात आली मात्र यावर कारवाई करण्यात आली नाही याच बरोबरीने सभांमध्ये मांडलेले विषय सभेच्या विषयी पत्रिकेवरही घेण्यात आलेले नाहीत नगरपरिषद स्वतः नगरसेवकाच्या मागण्यांबाबत उदासीन असल्याचे दिसते त्यामुळे आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे प्रवीण मोरे यांनी सांगितले आहे. प्रवीण मोरे एकटेच आंदोलनावर बसले असले तरी त्यांना अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे.जिल्हाध्यक्ष विकास मोरे,राजेंद्र पाटील,शहर प्रमुख भूषण संखे यांच्यासह पदाधिकारी यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.

चौकट:
नगरसेवक प्रवीण मोरे नैसर्गिक नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे व इतर विषय वेळोवेळी नगरपरिषद सभेमध्ये उपस्थित केले होते. यावेळी सभेच्या अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे यांनी प्रशासनाला कारवाईबाबत सूचित करून नगरसेवकाला उपोषण करण्याची वेळ येऊ नये असे सांगितले होते. तसेच कारवाई न झाल्यास आपणही आंदोलनाला पाठींबा देऊ असे म्हटले होते. मात्र नगराध्यक्ष काळे आंदोलन स्थळी फिरकलेल्याच नाहीत.

चौकट:
नगरपरिषद कर्मचारीच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीमध्ये आदिवासी समाजाच्या मुलावर अन्याय, पालघर पूर्व भागातील कारखाने यांचे सांडपाणी प्रक्रिया न करता जमिनीत सोडणे अशा तक्रारीही नागरिकांनी मोरे यांना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *