
पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील एका चौदा वर्षाच्या प्रणव सालकर या मुलाने चक्क घरासमोर पहार व टिकाव च्या साह्याने चार दिवसात खड्डा खोदून विहीर तयार केली आहे. आईला अर्धा किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने त्याने आईची काळजी घेण्यासाठी ही विहीर मेहनतीने तयार केली आहे.
प्रणव याची आई दर्शना व वडील रमेश हे बागायतीमध्ये मजूर म्हणून काम करतात. आई मजुरी करून थकून भागून आल्यानंतर अर्धा किलोमीटर पाण्याला जाते.तिला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास बघवत नसल्याने आदर्श विद्यालय केळवे या विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणवने विहीर खोडण्याचा निर्धार केला. घराच्या अंगणात त्याने पहारीने खड्डा खोदायला सुरुवात केली. दररोज थोडा थोडा खड्डा खोदून त्याने ही विहीर चार दिवसात पूर्ण केली. बारा ते पंधरा फूट खोल खड्डा केल्यानंतर त्याला गोड पाणी लागले आहे.
खड्डा खोदण्यासाठी प्रणावला अथक परिश्रम घ्यावे लागले. खोल खड्ड्यातून माती काढण्यासाठी त्याने स्वतःहून शिडी बनवली व त्याद्वारे तो माती खणून वर आणून टाकत होता. खड्डा खोदताना त्याला खडक लागले मात्र वडिलांच्या सहकार्याने त्याने हे दगडही काढले. अखेर खड्ड्यात पाणी आल्याने त्याचा आनंद अनावर झाला. खड्ड्यातील पाणी सालकर कुटुंब वापरण्यासाठी घेतात. त्यामुळे काही अंशी पाणी आणण्याचा त्रास दूर झाल्याचे प्रणवच्या आईने म्हटले आहे.
केळवे गावात धावांगे पाडा असून येथे सहाशे ते सातशे लोकवस्ती आहे. खाऱ्या जमिनीमुले विहीर व बोरिंगला पाणी खारट येते. त्यामुळे या पाड्याला पाण्याची चणचण आहे. नळाला आठवड्यातून रविवार, मंगळवार व गुरुवारी पाणी येते. मात्र हे पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांचे हाल होतात. असेच हाल प्रणवच्या आईचे होत होते. हाल अपेष्टा न बघवल्याने प्रणवने विहीर खोदण्याचा चंग बांधला व त्याच्या जिद्दीने त्याने विहीर खोदून पूर्ण केली. त्याची ही जिद्द पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे.