
सखल भागात पावसाचे पाणी साचले..
नालासोपारा :- मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारपासून सुरू झाला. रविवारी रात्रीपासून जोरदार बॅटिंग करून पावसाने वसई, विरार, नालासोपारा या परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे सखल आणि खोलगट भागात पाणी साचले आहे. महानगरपालिकेच्या गटारे नाले साफसफाई केल्याच्या दावा पोकळ ठरला आहे. सामान्य नागरिकांना, वाहनचालकांना, दुकानदारांना या पावसाच्या पाण्याचा फटका बसला आहे. मागील चार दिवसांत २२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शनिवारी संध्याकाळ पासूनच अधूनमधून पावसाची रिमझिम सुरुच होती. तालुक्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने धो-धो पावसामुळे वाहनचालकांना वाहतुक कोंडीची सामना करावा लागला. खड्डयांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकही धिम्या गतीने सुरु होती. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. धो-धो पावसामुळे नद्या, तलावे, विहिरी व धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नालासोपारा शहरात तर पूर्वेकडील गाला नगर, शिर्डी नगर, अलकापुरी, सेंट्रल पार्क, आचोळे रोड, तुळींज रोड, प्रगती नगर, आचोळे रोड या परिसरात चांगलेच पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरून येजा करताना रहिवाश्याना व वाहनांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. तसेच वसई, विरार आणि नायगाव परिसरातील खोलगट भागात पावसाचे पाणी साचले होते. नालासोपारा पूर्वेकडील काही परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तसेच गटारांचे घाण पाणीही रस्त्यावर आल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला त्रास निर्माण झाला होता. नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, एस टी डेपो रोड, समेळ पाडा, चक्रेश्वर तलाव, सोपारा गावातील काही परिसरात, गास, सनसिटी रस्ता, उमराळे, नाळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते.
रात्रभर कुठे किती पाऊस पडला…..
वसई तालुक्यातील वसई येथे ७४ मिलिमीटर, मांडवी येथे ८६ मिलीमीटर, विरार येथे १०४ मिलीमीटर, पेल्हार येथे ८६ मिलीमीटर, माणिकपूर येथे ७६ मिलिमीटर, निर्मळ येथे ६० मिलीमीटर, आगाशी येथे ७५ मिलीमीटर, बोळींज येथे ७३ मिलीमीटर आणि कामण येथे ७८ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी ८० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद केल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले आहे.