
माहीम ग्रामपंचायत हद्दीतील पिडको औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नोकरदार व नागरिक खड्डेमय व चिखलमय रस्त्यामुळे हैराण झाले आहेत.
माहीम ग्रामपंचायत हद्दीत जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे अनेक लहान, मध्यम व मोठे उद्योग तसेच नागरी वस्ती आहे. या उद्योगांच्या माध्यमातून व नागरिकांकडून माहीम ग्रामपंचायतीला दरवर्षी मोठा मालमत्ता कर प्राप्त होतो. बहुतांश उद्योग व नागरिक नियमित करभरणा करीत आहेत. मात्र त्याबदल्यात ग्रामपंचायत कोणत्याही भौतिक सुविधा किंवा सोयी देत नाहीत असा आरोप नागरिक करीत आहेत. श्रीमंत ग्रामपंचायत असतानाही उद्योगनगरीतील व नागरी वस्तीमधील रस्त्यांची दैनावस्था आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अनेकदा तक्रारी केल्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कंपन्यामध्ये काम करणारे कामगार हे स्थानिक नागरिक असून त्यांना या चाळण झालेल्या चिखलमय रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वार किंवा त्यांच्या पाठी बसलेले नागरिक दुचाकीवरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महिलांना चिखलमय रस्त्यावरून प्रवास करणे गैरसोयीचे ठरत आहे. अनेक नोकरदार या रस्त्याच्या खड्ड्यामुळे पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी उद्योग व नागरिकांच्या मागणीनंतर सामाजिक कार्यकर्ता रत्नदीप पाखरे यांनी विविध स्तरावर निवेदनातून केली आहे.