
गिराळेत पावसाचे पाणी तुंबल्याने भातशेतीचे नुकसान,दुबार पेरणीचे संकट
मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे मुळे पालघर तालुक्यातील गिराळे नावझे येथील शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे आरोप केले जात आहेत. या प्रकल्पामुळे नैसर्गिक नाले बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अलीकडेच सलग चार पाच दिवस पडलेल्या पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे नुकसानी झाली आहे. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
पालघर तालुक्यामध्ये मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे चे काम जोमात सुरू आहे. या कामादरम्यान तालुक्यामध्ये गिराळे, नावझे भागात माती भरावाचे काम सुरू आहे. माती भराव करताना ठेकेदार कुठलाही विचार न करता नैसर्गिक नाले बुजून टाकले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण होतात व हे पाणी नैसर्गिक नाल्यातून न जाता थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली गेल्याच्या घटना तीन चार दिवसापासून समोर येत आहे.शेतकरी हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
मासवण पासून कोपर फाट्या पर्यंतच्या २३ किलोमीटर लांबीच्या अंतराच्या रस्त्याच्या निर्मितीचे काम जी आर इन्फा प्रोजेक्ट्स कंपनी मार्फत केले जात आहे.दहिसर तर्फे मनोर,साखरे,नावझे, गिराळे, पारगाव आणि सोनावे गावांच्या हद्दीत महामार्ग निर्मितीसाठी माती भरावाचे काम सुरू करण्यात आले होते. माती भराव करताना नैसर्गिक नाल्यांवर माती भराव करून ते बुजवल्याने शेतकरी वर्गाने संताप व्यक्त करत बुजवलेले नैसर्गिक नाले मोकळे करण्याची मागणी केली. मात्र कंत्राटदार कंपनीने शेतकऱ्यांना मागणी कडे दुर्लक्ष केले.
गेल्या चार पाच दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बंद झाल्याने पावसाचे पाणी शेत जमिनी मध्ये भरले आहे.गिराळे गावच्या हद्दीत नाल्याच्या दोन्ही बाजूला सुमारे ३० एकर क्षेत्रात भात शेती केली जाते. पाणी तुंबल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक नाला बंद असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी वस्तीत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.