
वसई : वसई तालुका व वसई विरार शहर महानगरपालिकेशी संबंधीत प्रश्नांबाबत आमदार क्षितीज ठाकूर यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा मुक्कामी भेट घेतली. वसई तालुका व वसई विरार शहर महानगरपालिकेशी संबंधीत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दहीसर-मीरारोड-माणिकपूर-विरार मेट्रो रेल्वे, ठाणे घोडबंदर मार्गे विरार मेट्रो, वसई विरार उपप्रदेशातील विरार (पूर्व-पश्चिम) ते नायगाव (पूर्व-पश्चिम) रेल्वेला समांतर रस्ता विकसित करणे.

वसई तालुक्यात अतिवृष्टीमुळे साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करणे, १४व्या वित्तआयोगातून केंद्र शासनाकडून मिळालेला निधी इतर महानगरपालिकांप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेस मिळावा, LBT व इतर थकित अनूदाने महानगरपालिकेस मिळण्याबाबत, नव्याने स्थापन झालेल्या पोलिस आयुक्तालय वसई येथे निर्माण करणे, विकास आराखडयातील सार्वजनिक कामासाठी राखीव असलेल्या सरकारी जागा महानगरपालिकेस हस्तांतरीत करणे, M.M.R.D.A. च्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांना सुरूवात करणे. अशा तालुका व महानगरपालिका हद्दीतील अनेक विकास कामांची सविस्तर चर्चा झाली.
मा.मुख्यमंत्र्यांनी आपले सचिव भूषण गगराणी यांना वरील कामात लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. आमदार क्षितीज ठाकूर यांच्या सोबत शिष्टमंडळात माजी महापौर नारायण मानकर,माजी नगराध्यक्ष अजय खोखाणी व रमेश कोटी यांचा समावेश होता.