



वसई : (प्रतिनिधी) :
पेल्हारसारख्या अनधिकृत बांधकामांचा अड्डा असलेल्या परिसरात वाकणपाडा येथे एका 20 फुट अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. या मजुराच्या मृत्यूनंतर संवेदना संपलेले अनेक अधिकारी आता कारवाईसाठी पुढे सरसावले आहेत. ते हेच अधिकारी आहेत ज्यांनी अनधिकृत बांधकामांना आधी पाठिंबा दिला आणि एका मजुराच्या मृत्यूनंतर काम आपल्या अंगलट येतंय म्हटल्यावर कारवाईला जोर दिला आहे. अशा बेफिकीर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना पालिकेत राहण्याचा नैतिक अधिकारच उरला नाही असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस हरेश कोटकर यांनी पत्रकारशी संवाद साधताना म्हणाले आणि सातिवली परिसरातील सर्व्हे क्रमांक ५०/२ या भूखंडावर अशाच पद्धतीने अनधिकृत बांधकाम सुरू असून. या बेकायदेशीर बांधकामाला महसूल विभागाचे व पालिकेचे नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक नाल्यावर माती भराव करून महसूल विभागाची रेती व मातीची रॉयल्टी बुडून लाखोंच्या महसुलाची विकासकाने चोरी केली आहे. तर महापालिकेच्या हद्दीत होणारी अनधिकृत बांधकामं ही पालिका अधिकाऱ्यांसाठी सोन्याची अंडं देणारी कोंबडी ठरली आहे. सातिवली मधील सर्व्हे क्रमांक ५०/२ या भूखंडावर अशाच रितीने अनधिकृत बांधकाम झाले असून या बांधकामाला कोणी पाठिंबा दिलाय ते सांगण्याची गरज भासत नाही.
पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर आता पालिकेचे नवे प्रशासक तथा अतिरीक्त आयुक्त रमेश मनाळे यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, हा कारभार सोपवल्यानंतर रमेश मनाळे यांच्या कार्यकाळात पेल्हारच्या वाकणपाड्यात अनधिकृत बांधकामात एका मजुराचा बळी गेला तर 5 जण गंभीर जखमी झालेत. या रक्तपाताला खरंतर पालिका अधिकाऱ्यांचा हावरटपणा जबाबदार आहे. अनधिकृत बांधकामांतून मोठ्या प्रमाणात वसुल्या करण्यासाठी या अधिकाऱ्यांकडे खास दलाल आहेत. या दलालांच्या जीवावर उड्या मारून स्वत:च्या पोळ्या भाजणाऱ्या या अधिकाऱ्यांना प्रशासकीय काळात कोणताच लगाम उरलेला नाही. असे चित्र आहे. सातिवली मधील अनधिकृत बांधकामात असेच एखाद्या निरपराध नागरिकाचे प्राण गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग येणार का? असा संताप आता खदखदू लागला आहे.