

वसई, दि.24(वार्ताहर)
महिलांनी आपल्या मासिक पाळीच्या वेळी स्वतःची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या घरातील मुलींनाही वयात येताना याबाबत संकोच न करता, स्वच्छता, तसेच आरोग्याच्या दृष्टीने योग्य माहिती,तथा ज्ञान देऊन जैविक सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्यास सांगावे, असे प्रतिपादन ‘स्टेपअप इंडिया फाऊंडेशन’च्या सौ. यति राऊत यांनी
“चला ‘ती’ला समजून घेऊया” या महिलांच्या जागृती विषयक कार्यक्रमात बोलतांना केले.
पालघरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी व कार्यालयीन महिला कर्मचारी यांच्यासाठी पोलिस अधीक्षक श्री गौरव सिंग आणि पोलीस उप अधीक्षक(गृह) श्री विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टेपअप इंडिया फाऊंडेशन’च्या सहकार्याने आयोजित
या कार्यक्रमात सौ. यति राऊत यांनी, महिला पोलिसांना ड्युटीवर असताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाचे आहे? याबाबत, तसेच मासिक पाळी विषयी असलेल्या अंधश्रद्धा विषयी या कार्यक्रमादरम्यान जागृती केली.
पोलीस उपनिरीक्षक रूपाली गुंड यांनी प्रास्ताविक केले. महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नांवर पालघर येथे सेमिनार आयोजित करण्यासाठी स.पो.उ.नि. सुरेंद्र शिवदे यांनी परिश्रम घेतले. सेमिनार मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होत्या. त्यांना आरोग्यमय नोकरीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या समस्यांचे समाधानही करण्यात आले. या “स्टेपअप फाऊंडेशनच्या” माध्यमातून संपुर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये सेमिनार आयोजित करण्यात येणार असून रोटरी क्लबच्या माध्यमातुन शक्य तिथे “सॅनिटरी पॅड वेंडींग मशिन्स्” लावण्यात येणार आहेत. स्टेपअप इंडिया फाऊंडेशन’ ही यती राऊत आणि स्वप्नील शिर्सेकर या दोन भावाबहिणीची संस्था असून संपूर्ण महाराष्ट्रात मासिक पाळी आणि जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन या विषयावर गेले दोन वर्षे सातत्याने महिला आणि वयात येणाऱ्या मुलींमध्ये जागृतीचे काम करीत आहे.