नालासोपारा :- शहरात जिथे जलवाहिन्या नाहीत, जिथे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही त्या भागातील नागरिकांची तहान अनेक टँकरद्वारे भागविण्यात येते. पण वसईत तहान भागविणाऱ्या काही टॅंकरला आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र नसून ते बिनधास्तपणे रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मनपा प्रशासनासह आरटीओचे या गंभीर विषयाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

शहरात सर्रास भंगार व विनाक्रमांक धोकादायक टॅंकरच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या टॅंकरच्या निमित्ताने फिटसनेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरात सध्या एक ते दोन दिवसांआड कमी दाबाने पाणी येत आहे. सध्या भीषण उन्हाळा जाणवत असल्याने पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अनेक वसाहतींना नळयोजनाच नसल्याने त्यांना पाण्याच्या टॅंकरवर तहान भागवावी लागत आहे. पाण्याची मागणी वाढल्याने, सध्या शहरात टॅंकरचा व्यवसाय जोरात सुरू आहे. शहरातील रस्त्यावर राजरोसपणे जुनाट झालेले भंगार टॅंकर, विनाक्रमांकाचे टॅंकर रस्त्यावर चालवले जात आहेत. याशिवाय टॅंकरला जोडलेल्या विनाक्रमांकाचे टॅंकरही बिनदिक्कतपणे सुरू आहेत. वळण घेताना हे चालक अचानकपणे वेगात वळण घेतात, त्यामुळे अन्य वाहनांना आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. टॅंकरला क्रमांक, रिफ्लेक्‍टर, ब्रेक लॅम्प, स्टॉपगार्ड बसवणे आवश्‍यक आहे. मात्र यातील एकाही बाबीची पूर्तता केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

वसई विरारमध्ये अनेक भागात हजारो अनधिकृत पाण्याचे टँकर बिनधास्तपणे सुरु आहेत. गेल्या पाच वर्षांत या टँकरने चिरडून रस्ते अपघातात शेकडो जणांचा बळी घेतला असून शेकडो जखमी झाले आहेत. वसई विरार परिसरातील पाण्याची टंचाई पाहता बहुतांश रहिवासी व सोसायट्यांना या अनधिकृत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या टँकरचालकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. काही टँकर चालक दारूच्या नशेत असतात. ते चालक टँकरची गती वाढवून अधिक कमाईच्या शोधात अनेक लोकांना चिरडतात. येत्या काही दिवसांत टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, रस्ता ओलांडताना महिला व बालकाचा मृत्यू अश्या अनेक अपघातांना हे अनधिकृत टँकर चालक जबाबदार आहेत. मरण पावलेल्या व्यक्तीमूळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, तर बरेच जण जखमी झाले आहेत

काय आहे नियम

पाणी वाहतुकीचे टॅंकर हे आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. अशा वाहनाची आरटीओ निरीक्षक तपासणी करून वाहन योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला फिटनेस प्रमाणपत्र देतात. फिटनेस प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन चालवता येत नाही. अशा वाहनांना प्रत्येक वर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे.

कोट

१) १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च या कालावधीत २८९ टँकरची तपासणी केली आहे. यात ६५ दोषी टँकर सापडले असून ७ लाख २३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. – प्रवीण बागडे (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, विरार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *