
विरार मध्ये घडलेला प्रकार हा निंदनीय आहेच. या तरुणांच्या आत्महत्येला पोलीस अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत. कारण वर्दीच्या मस्तीत अनेक निष्पाप नागरिकांना त्रास दिला जातो हे नेहमीचेच आहे काही कर्तव्यदक्ष अधिकारी त्याला अपवाद असतीलही. एकंदरीत वसई विरार मध्ये पोलीस तेव्हाच तत्परतेने काम करतात जेव्हा त्यांच्यावर वरिष्ठांचे जबरदस्त प्रेशर असेल किंवा काही हितसंबंध असतील तरच.
अन्यथा हे फॅमिली मॅटर आहे, तूम्ही कोर्टात जा किंवा वसईला महिला कक्षेत जाऊन तक्रार करा यामध्ये वेळ मारून नेतात, ही सत्य परिस्थिती आहे. यांची सत्य घटना अर्नाळा पोलीस ठाण्यात पाहायला मिळाली होती. मग या प्रकरणी पोलिसांनी अति स्वारस्य का दाखवले? का तरुणाच्या वैयक्तीक बाब अशी भर पोलीस स्टेशनमध्ये हास्यस्पद करून मानसिक खच्चीकरण करून आत्महत्येस प्रवृत्त केले? आदी बाबी विचारात घेऊन सकोल चौकशी होणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्रात चालत असेल, तर कायद्याचे राज्य, निती नियमाचे राज्य, मानवाधिकार आयोग सुरळीत अस्तित्वात असलेले राज्य व जनतेला न्याय मिळण्याची खात्री असलेले राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होईल. याच बरोबर भ्रष्ट पोलीस अधिकारी कोणत्या भ्रष्ट यंत्रणेमुळे पोलीस प्रशासनात आहेत, याचाही तपास होणे, आवश्यक आहे. माणूस आत्महत्या तेव्हाच करतो, जेव्हा तो निराशेच्या खोल गर्तेत जातो. किंवा मग न्याय मिळण्याचे सर्व मार्ग बंद होतात. आत्महत्या केलेला तरुण गरीब होता. निर्ढावलेले किंवा अट्टल गुन्हेगार व्यक्ती सहसा आत्महत्या केलेले उदाहरणे कमी आहेत, हे पाहता या प्रकरणी निवृत न्यायमूर्ती यांच्या अधिकारात चौकशी समिती नेमण्यात यावी, असे झाले तरच सत्ताधाऱ्यांना माणुसकीची थोडीतरी जाण आहे, असे पाहण्यात येईल.