संघटनेचे 36 हजार मतदार असल्याचा दावा

सरकार व स्थानिक प्रशासन संविधान व कायदा मानत नसल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालघर जिल्ह्यातील आदिवासी दलित सेनेने घेतला आहे. आदिवासी दलित सेनेशी संबंधित असलेले 36 हजार मतदार निवडणुकीवर बहिष्कार करत असल्याचे निवेदन संघटनेमार्फत विविध स्तरावर देण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी दलित समाजावर तसेच वंचित कुटुंबाच्या अन्यायाविरोधात दलित सेनेमार्फत वारंवार शासन – प्रशासनाच्याच्या विरोधात आंदोलने करण्यात आली आहेत. आरोग्य, कुपोषण, शिक्षण, शिक्षक भरती, दळणवळणची अपुरी साधने, रस्त्यांची दुरावस्था असे विविध प्रश्न घेऊन दलित सेनेने ही आंदोलने केली आहे. प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला प्रशासनामार्फत आश्वासने दिल्यानंतरही ती आश्वासने पाळली गेलेली नाहीत. त्यामुळे वंचितांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे म्हणत शासन प्रशासन या वंचितांची दखल घेत नसल्याने या अन्यायाविरोधात २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आदिवासी दलित सेना व त्या अंतर्गत असलेले घटक व आदिवासी दलित बांधव बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन आदिवासी दलित सेनेचे अध्यक्ष व माजी आमदार अविनाश सुतार यांनी दिले आहे. हे निवेदन आदिवासी दलित सेनेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे अप्पर मुख्य सचिव, कोकण विभागीय आयुक्त व पालघर जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे. तर आदिवासी दलित सेनेमार्फत 36 हजार मतदार मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचा इशारा निवेदनातून दिला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *