
कामण सागपाडा येथे अनधिकृत बांधकामे जोमात, वालीव विभाग मात्र कोमात
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधीच कामणमध्ये भूमाफिया गुप्ता व पालिका अधिकाऱ्यांना अच्छे दिन
वसई : प्रतिनिधी :
वसई पूर्वेतील कामण परिसरातील सागपाडा परिसरातील निमिषा इम्पेक्स च्या पुढे अंदाजे २ ते ३ लाख चौरस फुटावर अनधिकृत बांधकामे डोके वर काढू लागली आहेत. याच कामणच्या शेजारील पोमण गावात अनधिकृत बांधकामामुळे दोन निरपराध मजुरांचा जीव तीन वर्षात गेला आहे. निकृष्ट दर्जाची बांधकामे करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला घोर लावणे, अनधिकृत बांधकामे करून महापालिकेच्या हक्काचा लाखो करोडोंच्या महसुलाची चोरी करणे असे उद्योग भूमाफिया राजरोस करत असतानादेखील महापालिका अधिकारी सदर अनधिकृत बांधकामांवर सर्रास कानाडोळा करत आहेत. दरम्यान, आता नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच कामण परिसरात भूमाफिया गुप्ता याला व त्याचे अनधिकृत बांधकामांचे धोतर सांभाळणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना कमाईचे अच्छे दिन आले आहेत. या अनधिकृत बांधकामामुळे महापालिकेच्या कारभाराचे तर धिंडवडे उडाले आहेतच, मात्र अशा अनधिकृत बांधकामात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावरचा विश्वास देखील उडाला आहे.
कामण परिसरात कोण तो गुप्ता नामक भूमाफिया आपल्या अनधिकृत बांधकामाचे चोचले पुरवत असताना त्याच्यावर कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल कामण परिसरात होत आहे. कामण येथील सागपाडा येथील निमिशा इंपेक्स च्या पुढे अनधिकृत बांधकामे २ ते ३ लाख चौरस फूट क्षेत्रावर वाढीस लागली आहेत. मात्र तरीही अनधिकृत बांधकामे मोठ्या तोऱ्यात उभी राहत असतील तर हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे.
महापालिकेने दक्षिण विभागाचा भार उपायुक्त अजित मुठे यांच्याकडं सोपवला आहे. मात्र हे महाशय किरकोळ अनधिकृत बांधकामांवर छाटछूट कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागले आहेत. आरक्षित व महत्वाच्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे वाढीस लागली असताना या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचे उपायुक्त या नात्याने अजित मुठे कारवाईची मूठ का आवळत नाहीत, असा प्रश्न पडला आहे.
दरम्यान, कामण परिसरात अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत आहेत. निमिशा इम्पेक्सच्या पुढे अनधिकृत बांधकामे जोमाने वाढत आहेत. सुमारे २ ते ३ लाख चौरस फूट क्षेत्र फळावर सदरच्या अनधिकृत बांधकामाचा बाजार वाढला आहे. महापालिकेने बाजार उठवावा असे वाटत नाही का? की अधिकाऱ्यांना आर्थिक व्यवहाराचा भूमाफिया गुप्ता याने मोठा डोस दिला आहे. असा आरोप होऊ लागला आहे.