
एस. एस. एस. एंटरप्रायजेस या ठेकेदाराचे बिल थांबविण्याची मागणी
प्रतिनिधी वसई : येथील वासळई ग्रामपंचायत हद्दीत वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून एका गटार निर्मितीचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. परिणामी या परिसरातील रहिवाशांनी पालिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निकृष्ट काम करून सामान्य नागरिकांना संकटात टाकू पाहणाऱ्या ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे; तसेच या गटाराचे काम नव्याने व्यवस्थित करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सचिव तसनिफ शेख यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी बुधवार, 12 जून रोजी आयुक्तांना सुपूर्द केले आहे.वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून पावसाळी पाण्याचा निचरा करण्याच्या उद्देशाने वासळई ग्रामपंचायत हद्दीत एका गटाराचे काम हाती घेण्यात आले आहे. या गटाराचे काम एस. एस. एस. एंटरप्रायजेस या ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु त्यांनी हे काम करताना आवश्यक काळजी घेतलेली नाही. किंबहुना झाकण लावण्याऐवजी केवळ खडी आणि सिमेंट लावून गटाराचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय गटाराच्या पाईपवर केवळ माती टाकण्यात आलेली आहे. त्यावर आता महापालिका डांबरीकरण करणार आहे. बहुतांश ठिकाणी गटाराचे पाईप रस्त्याच्याउंचीपेक्षा वर आलेले आहेत. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येणार आहेत. परिणामी वासळई ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पावसाळ्यात दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या घरादारांत पाणी शिरण्याचा धोकाच अधिक आहे, अशी भीती वसई भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सचिव तसनिफ शेख यांनी व्यक्त केलेली आहे. विशेष म्हणजे; 57 लाख 12 हजार 433 इतकी अंदाजपत्रकीय रक्कम असलेल्या या कामाचे भूमिपूजन स्थानिक सत्ताधारी पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीने मोठा गाजावाजा करत केलेले आहे. या कामाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे या गटाराच्या निकृष्ट कामाकडे मात्र लक्ष नाही. किंबहुना बहुजन विकास आघाडी अशापद्धतीने भ्रष्टाचाराला उत्तेजन देत आहे. ठेकेदारांना पाठिशी घालत आहे, असा संताप व्यक्त करत तसनिफ शेख यांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निकृष्ट काम करून सामान्य नागरिकांना संकटात टाकू पाहणाऱ्या एस. एस. एस. एंटरप्रायजेस या ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे, अशी आग्रही मागणी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.