वसई, दि. १० (प्रतिनिधी) वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली, सिडको प्रशासन बरखास्त झाले आणि बरोबर मालकी जागांसह आदिवासी जागांना सुगीचे भाव आले.या भूखंडांवर डोळा ठेवून परप्रांतीय व स्थानिक धनदांडग्यांनी महसूल व पालिका अधिका-यांना मलईदार लोणी देत आपले इप्सित साध्य केले. या सर्वात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर आपली नितीमत्ता भूमाफियांच्या पदरी गहाण ठेवून अनधिकृत बांधकामांना सपोर्ट सिस्टीम म्हणून ऑक्सिजन पुरवण्यास सुरूवात केली आहे. याच अधिकाऱ्यांच्या स्वार्थलोलूप प्रवृत्तीमुळे वसईतील निसर्गाची सेवा करणारा, त्याला देवसमान मानून वन्यसंपदेची जीवापाड राखण करणारा आदिवासी समाज मात्र आपल्याच भूमीतून हद्दपार होत देशोधडीला लागला आहे. आदिवासी नागरिक व्यथेने कासाविस झालेले असताना पेल्हारचे मंडळ अधिकारी अभिजीत भगाडे व शिरसाडचे मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी भूमाफियांची पाठराखण करत आदिवासी नागरिकांच्या तोंडचा घास हिरावला आहे. या मस्तवाल व रक्तपिपासू अधिकाऱ्यांवर शासनाने कठोरातील कठोर कारवाई करावी यासाठी बविआचे दिलीप गायकवाड हे उद्यापासून (दि.१२ जुलै) वसई पश्चिमेतील प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत.

दरम्यान, दिलीप गायकवाड यांनी मंडळ अधिकारी अभिजीत भगाडे व सुशांत

ठाकरे हे कसे भूमाफियांसाठी काम करत आहेत. त्याची कुंडलीच तहसिलदार व

प्रांताधिकाऱ्यांना सादर केली आहे. यावर सबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कारवाई

होत नसल्याने दरम्यान, पेल्हार येथील सर्व्हे क्रमांक २८०/१ या आदिवासी

कु. का. भूखंडावर धनदांडग्या भूमाफियाकडुन सुरू असलेले अनधिकृत बांधकाम हे

मंडळ अधिकारी अभिजित भगाडे यांच्य कृपादृष्टीने सुरू आहे. तसेच वालीव येथील

सर्व्हे क्र.७०/१/९ या जागेत एका भूमाफियाने बोगस फेरफाराच्या माध्यमातून सदर

इसम मयत असताना जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला. याबाबत कारवाईसाठी

प्रकरण निदर्शनास आणूनही कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने संशय वाढला

आहे. त्याचप्रमाणे विकासक कमलेश दोषी ह्याने संगनमताने केलेल्या अनधिकृत

बांधकामास मंडळ अधिकारी अभिजीत भगाडे याने पाठीशी घातल्याप्रकरणी

पुराव्यांनुसार कमलेश दोषीवर फौजदारी कार्यवाही होणे अपेक्षित असताना संबंधित

अधिकाऱ्याने त्यालाच पाठीशी घालून तहसिलदारांना खोटा अहवाल सादर केल्याचे

दिलीप गायकवाड यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे गावमौजे वालीव येथील सर्व्हे क्र. २६/१ आणि पेल्हार-धानिव येथील सव्हें क्र. ५१/२ या महाराष्ट्र शासनाच्या जागेत (डोंगरात) मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन झाले असून या प्रकारावर कारवाई करण्याचे सोडून संबंधित अधिकारी बेकायदेशीर उत्खन करणाऱ्यालाच पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. कोरोनासारख्या महामारी काळातही झालेले उत्खनन मंडळ अधिकारी अभिजीत भागडे व सुशांत ठाकरे यांनी नियम धाब्यावर बसवून भूमाफियांना बेकायदेशीर साथ दिली. शिवाय कलेक्टर पालघर, प्रांत वसई आणि तहसिलदार वसई यांचे लेखी आदेश असतानाही अजुन तहसिलदार यांना दोन्हीं सर्कल यांनी अहवाल सादर केला नाही. त्यांच्याकडे अनेक तक्रारी करून आदिवासी नागरिकांची कशी घुसमट भूमाफियांमार्फत होत आहे, याबाबत वस्तुस्थितीजन्य पुरावे देऊनही सदर अधिकाऱ्यांनी कर्तव्यात मोठ्या प्रमाणात कसुर केला आहे. या अधिकाऱ्यांवर त्यानुसार कारवाई होणे अभिप्रेत असतानादेखील कोणतीच कार्यवाही वरीष्ठ स्तरावरून न झाल्याने दिलीप गायकवाड उद्यापासुन प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. तसेच जोपर्यंत महसूल विभाग सदर दोषी व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत नाही, तोवर आपण आपले उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *