वसई । प्रतिनिधीः विरारचे रहिवाशी तथा मुंबईचे रणजीपट्टू सुरेश देवभक्त उर्फ दोदू यांचे आगाशी येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले,ते ८३ वर्षांचे होते.
देवभक्त हे उत्कृष्ट ऑलराऊंडर होते,मात्र,त्यांना क्रिकेट क्षेत्रात कोणीही गाॅडफादर नव्हता.१९७९ च्या काळात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात मुंबईचे सुनील गावसकर,दिलीप सरदेसाई,एकनाथ सोलकर,अशोक मंकड,फारुख इंजिनीयर हे सहा खेळाडू होते.त्या काळात मुंबई संघात सहा कसोटीपटूंचा समावेश असताना इतर दर्जेदार खेळाडूंना जवळपास फिरकण्याची ही हिंमत होत नव्हती.मात्र,मुंबईपासून ६० किमी अंतरावर विरारमधील आगाशी गावातील तरुण सुरेश देवभक्त याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अजित वाडेकरांच्या मुंबई संघात स्थान मिळवले.दोदू या नावाने मुंबईच्या क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असणारा देवभक्त वसईतील मुंबईतर्फे रणजी स्पर्धेत खेळणारा पहिला क्रिकेटपटू होते.
मुंबईतील क्रिकेट मैदाने आपल्या घणापाती फलंदाजीने आणि अचूक टप्यावरील ऑफ कटर्सने देवभक्त यांनी गाजवली होती.बडोदे विरुद्ध रणजी स्पर्धेत त्यांना पहिली संधी मिळाली होती.त्या संघात कर्णधार अजित वाडेकर,दिलीप सरदेसाई,एकनाथ सोलकर,सुनील गावसकर,अशोक मंकड,रामनाथ पारकर, मिलिंद रेगे,अजित नाईक,मेहता,अजित पै,पद्माकर शिवलकर,शरद हजारे,सुधीर नाईक,अब्दुल इस्माईल,महेश संपत,विजय कारखानीस,सुरेश तिगडी अशा दिग्गज मुंबईकर खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघात दोदू देवभक्त हे एकच खेळाडू ग्रामीण भागातले होते.त्या सामन्यात मुंबईचा संघ अवघ्या ४२ धावांत गडगडला,त्यातील ८ धावा देवभक्त यांच्या होत्या.त्यानंतर मुंबईने बदोद्याला अवघ्या ३८ धावांत गुंडाळले होते.हा सुरेश देवभक्त यांचा पहिला आणि अखेरचा रणजी सामना होता.चांगली कामगिरी करुनही केवळ गाॅडफादर नसल्यामुळे आणि मानी स्वभावामुळे आताच्या टी-ट्वेण्टी क्रिकेटप्रमाणे फटकेबाजी करणा-या दोदू यांनी संघात स्थान मिळवण्यासाठी कोणापुढे हात पसरले नाही.
नॅशनल क्रिकेट क्लब,यंग मेन्स क्रिकेट आणि नवरोझ क्रिकेट संघांतर्फे मुंबईतील स्थानिक स्पर्धातून देवभक्तने अनेक चांगले पराक्रम केले.आंतरकॉलेज स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शतक आणि चार बळी घेत त्याने अंतिम सामन्यात रुईयाविरुद्ध ३५ धावा केल्या.सुप्रसिद्ध कांगा क्रिकेटमध्ये १०० वळी आणि १००० धावा करणारा ते वसईतले एकमेव क्रिकेटपटू होते.हार्ड कॅसल वॉर्ड कंपनीतर्फे टाइम्स गटात खेळताना देवभक्तने बलाढ्य टाटाविरुद्ध ९६ धावा फटकावल्या होत्या.माजी कसोटीपटू सलीम दुराणीसह त्यांनी पाचव्या विकेटसाठी १८७ धावांची भागीदारी केली होती. या दोघांच्या पराक्रमांच्या जोरावर हार्ड कॅसल कंपनीने मॅकेन्झी ढाल जिंकली होती.त्यानंतर सेंट्रल बॅंक आणि टाटा स्पोर्टस क्लबतर्फे खेळताना देवभक्त यांनी अनेक पराक्रम केले.मुंबईतल्या क्रिकेटपटूंच्या गळ्यातला ते ताईत बनले होते.कॉस्मोपॉलिटन क्रिकेट स्पर्धेत २०६ धावा फटकावून त्यांनी दिलीप सरदेसाईचा विक्रम मोडीत काढला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *