
आमदार क्षितिज ठाकुरांच्या वाढदिवसानिमित्त झळकले बांधकाम माफ़ीयांचे बॅनर?
बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचा दावा?
पत्रकार मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला अर्षद चौधरीही बविआचा सक्रिय कार्यकर्ता?
विरार(प्रतिनिधी )-दि.१० जुलै रोजी बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा मतदारसंघाचे आमदार क्षितिज ठाकूर यांचा वाढदिवस होता. वास्तविक वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचा वर्षाव होतोच. परंतू यावेळी आमदार क्षितिज यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क वसई विरार क्षेत्रातील कुख्यात बांधकाम माफियांचे बॅनर झळकले आहेत.या बांधकाम माफियांनी या बॅनरबाजीतून आपण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे.विशेष म्हणजे यातील काही बांधकाम माफियांची नावे पालिकेच्याच एका वादग्रस्त सहा.आयुक्ताने त्याच्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्येही उघड केली होती.आता या बांधकाम माफियांनी स्वतःला थेट बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे या बांधकाम माफियांना बविआ नेत्यांची साथ आहे का?असा सवाल आता सर्व स्तरातून विचारला जात आहे.
वसई विरार पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे नवी नाहीत.येथील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न उच्च न्यायालयापर्यंत पोचला आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाची प्रतीमा आधीच मळीण झाली आहे.शिवाय अनधिकृत बांधकामांमुळे झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.परंतु याबाबत पालिका अथवा येथील राजकिय पक्षांनीही गांभीर्याने घेतलेले नाही.पालिका क्षेत्रात एकीकडे अनधिकृत बांधकामांचा आलेख वाढत असताना दुसरीकडे पालिका अधिकारी राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे बोलले जात आहेत. पालिकाक्षेत्रात अनधिकृत बांधकाम करणारे बहुतांश बांधकाम माफिया येथील स्थानिक पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समोर आले आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या बांधकाम माफ़ीयांचे शुभेच्छांचे बॅनरही झळकले आहेत.यामध्ये इर्शाद खान,सुशील आव्हाड, शहजाद खान,रफिक पठाण, हमीद शेख,अर्षद चौधरी आदी बांधकाम माफियांची नावे समोर आली आहेत.त्यातच
पत्रकार मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला अर्षद चौधरी हाही बविआचा सक्रिय म्हणून वावरत आहे. शिवाय ही बॅनर बाजी करताना या बांधकाम माफियांनी बविआच्या वरिष्ठ नेत्यांच्या फोटोंचा आधार घेतला आहे. त्यामुळे वसई विरार क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना बविआ नेत्यांची साथ आहे का?असा सवाल वसई विरार वासीय विचारत आहेत.