विरार दि. २७/०७/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्तांना यापूर्वी पत्रव्यवहार करून सुद्धा रस्तावरचे खड्डे न बुजविल्याने बहुजन समाज पार्टीचे द्वारे १ ऑगस्ट २०२४ रोजी रस्त्यातील खड्ड्याच्या विरोधात खड्डा दिसेल तेथे वृक्षारोपण करण्याचे ठरविले आहे. असे बहुजन समाज पार्टीचे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांनी मिळून वसई-विरारची दुर्दशा करायला घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षा करीता वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती- A ते I मधील रस्त्यावरील खड्डे बुजविणे, डागडुजी करणे या कामासाठी अंदाजित रक्कम रु. १८० करोड रुपये खर्च करून सुद्धा नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने महापालिकेच्या सर्वच प्रभागात खड्डे पडल्याचे आढळून येत आहे. खड्ड्याची डागडुजी करण्यात आलेले काम हे दर्जेदार न केल्यामुळे एका पावसातच परत त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची चाळणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेचे रु. १८० करोड रुपये अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांनी पाण्यात बुडविल्याने जनतेत मोठा रोष निर्माण झालेला आहे.

ठेकेदार, १) मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनी, २) मे. श्री. सदगुरु कन्स्ट्रक्शन, ३) मे. गजानन कन्स्ट्रक्शन, ४) मे. श्रीजी इपीसी प्रा. लि., ५) मे. राठोड भाग्यजीत अँड कंपनी, ६) मे. साईगणेश एन्टरप्राइजेस, ७) मे. आर. अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि., ८) मे. अभय जाधव, ९) मे. चंदना कन्स्ट्रक्शन, १०) मे. दक्ष एन्टरप्राइजेस, ११) मे. जय भवानी इन्फ्रा प्रोजेक्ट,
१२) मे. जिजाऊ रोड बिल्डर प्रा. लि., १३) मे. नेवाळकर एन्टरप्राइजेस व १४) मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांनी वसई-विरार च्या जनतेचे रु. १८० करोड एका पावसात उधळल्याने सदरची संपूर्ण रक्कम सर्व १० ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावी.

तसेच रस्त्याच्या कामाचा उत्तरदायित्वाचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी परत खड्डे पडल्याने सर्व कामे परत करून घेण्यात यावी. असेही प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.

दि. २८/०९/२०२० रोजीच्या पत्रा नुसार व करारा नुसार गुजरात गॅस लि. यांनी “वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गॅस वाहिन्या भूमिगत अंथरणेसाठी रस्ते खोदाई केल्या नंतर रस्ते पुनर्भरण व पॅचवर्क चे काम तात्काळ पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महापालिकेची होती परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सदरचे काम वेळेत पूर्ण करून न घेतल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सदरच्या विषया बाबत महापालिका आयुक्त यांना यापूर्वी पत्र देऊन सुद्धा संबंधित ठेकेदारांविरोधात लोकहिताची कोणतीही कार्यवाही न केल्याने दि. ०१/०८/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता बहुजन समाज पार्टीच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष रोपण आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनामुळे सुस्त पडलेल्या महापालिका प्रशासनाला जाग येऊन पॅचवर्क करण्यात दोषी असलेल्या सर्व ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकून कार्यवाही करावी व तात्काळ रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावे यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष रोपण आंदोलन करणार असल्याचे प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *