

विरार दि. ०१/०८/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्याच्या विरोधात बहुजन समाज पार्टी द्वारे दिसेल त्या खड्डयात वृक्षारोपण करण्यात आले.
डी एन खरे यांनी बोलताना सुरुवातीलाच भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांनी मिळून वसई-विरारची दुर्दशा करायला घेतली असल्याचे सांगितले.
सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षा करीता वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती- A ते I मधील रस्त्यावरील खड्डे बुजविणे, डागडुजी करणे या कामासाठी अंदाजित रक्कम रु. १८० करोड रुपये खर्च करून सुद्धा नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने महापालिकेच्या सर्वच प्रभागात खड्डे पडल्याचे आढळून येत आहे. खड्ड्याची डागडुजी करण्यात आलेले काम हे दर्जेदार न केल्यामुळे एका पावसातच परत त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची चाळणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेचे रु. १८० करोड रुपये अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांनी पाण्यात बुडविल्याने जनतेत मोठा रोष निर्माण झालेला आहे.
वसई विरार महापालिकेतील भ्रष्टाचार समजावून सांगताना प्राध्यापक डी. एन. खरे यांनी सांगितले की, 100 रुपयाच्या अंदाजीत रकमेच्या काम हे 20% कमी दराने ठेकेदार काम घेतो, ठेकेदार 20% अधिकाऱ्यांना लाच देतो, 30 टक्के स्वतःचे प्रॉफिट घेतो. आणि 30% मध्ये काम पूर्ण करतो. अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार झाला तर कामाचा दर्जा कसा राहील ? असा सवाल बहुजन समाज पार्टीची जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केला. हा प्रश्न वसई विरार च्या प्रत्येक नागरिकाने आयुक्ता अनिलकुमार पवार यांना विचारावा असे आव्हान प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केले.
ठेकेदार, १) मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनी, २) मे. श्री. सदगुरु कन्स्ट्रक्शन, ३) मे. गजानन कन्स्ट्रक्शन, ४) मे. श्रीजी इपीसी प्रा. लि., ५) मे. राठोड भाग्यजीत अँड कंपनी, ६) मे. साईगणेश एन्टरप्राइजेस, ७) मे. आर. अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि., ८) मे. अभय जाधव, ९) मे. चंदना कन्स्ट्रक्शन, १०) मे. दक्ष एन्टरप्राइजेस, ११) मे. जय भवानी इन्फ्रा प्रोजेक्ट,
१२) मे. जिजाऊ रोड बिल्डर प्रा. लि., १३) मे. नेवाळकर एन्टरप्राइजेस व १४) मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांनी वसई-विरार च्या जनतेचे रु. १८० करोड एका पावसात उधळल्याने सदरची संपूर्ण रक्कम सर्व १० ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावी.
तसेच रस्त्याच्या कामाचा उत्तरदायित्वाचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी परत खड्डे पडल्याने सर्व कामे परत करून घेण्यात यावी. असेही प्रा. डी. एन. खरे यांनी सांगितले.
तसेच संबंधित सर्व 20 ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी कार्यवाही न केल्यास बहुजन समाज पार्टी लोकआयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्राध्यापक डी. एन. खरे यांनी सांगितले.