
पोलीस ठाण्यासह तहसीलदार, पालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल
वसई :सत्तर वर्षांपासून अस्तित्वात अस- लेली पिण्याच्या पाण्याची विहीर रातोरात गायब झाल्याने याबाबत विरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. विरार पूर्वे स राजो पाटील चाळ येथील रहिवासी या पिण्याच्या पाण्याचा वापर मागील काही वर्षापासून करत होते. आता सदरची विहीर रातोरात बुंजवल्याने ही विहीर शोधून काढणे व संबंधितां विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासह तहसीलदार व वसई विरार महानगरपालिकेचीआहे. अधिक माहितीनुसार, येथील राजो पाटील चाळीच्या रहिवाशांसाठी हे नैसर्गिक स्त्रोत उपयुक्त होते. या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जायचे परंतु किरण तुकाराम ठाकूर यांनी या ठिकाणी बेकायदा बांधकाम करताना ही विहीर बुंजवून नष्ट केल्याच्या लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याविहिरीत मासे, कासव व अन्य जलचर प्राणी अस्तित्वात होते. असे असतानाही बेकायदेशीररित्या जलस्त्रोत कायद्याचे उल्लंघन करून निर्दयीपणे ही विहीर नष्ट करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या विहिरीची नोंद भूमी अभिलेख, वसई यांच्या दप्तरी अस्तित्वात आहे. असे असतानाही संबंधितांनी केलेल्या या गैरकृत्याचा फटका येथील रहिवाशांना बसलेला आहे. येथून जाणारा रस्ताही बंद केल्यामुळे रहिवाशी संतप्त आहेत. याबाबत रहिवाशांनी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, तहसीलदार अविनाश कोष्टी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे यांना तक्रारी निवेदन देऊन वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली आहे.
वास्तविक पाहता नैसर्गिक जलस्त्रोत अशा प्रकारे नष्ट करता येत नाहीत. हे गैरकृत्य करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. वसईतील प्रशासकीय यंत्रणा बिल्डर धार्जिण्या असल्यामुळे अशा प्रकरणात कारवाईस बगल दिली जाते. ही शक्यता पाहता येथील रहिवासी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत धोंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.